नागपूर : डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेने १६ जुलैपासून घराघराची विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेतली. आतापर्यंत १ लाख ८५ हजार १७३ घरांची तपासणी करण्यात आली. त्यात ९ हजार ८०१ घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आल्या. विशेष म्हणजे, मोहिमेला दीड महिन्याचा कालावधी होऊनही रोज ३०० दूषित घरांची भर पडत आहे. यामुळे सर्वेक्षणाचा उद्देशच मागे पडला आहे.
डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मनपाच्या हिवताप हत्तीरोग विभागाच्या वतीने झोनस्तरावर बाराही महिने घराघराची तपासणी केली जाते. परंतु कोरोनामुळे या वर्षी योग्य पद्धतीने तपासणी झालीच नाही. जून महिन्यापासून डेंग्यूच्या रुग्णात वाढ होताच १६ जुलैपासून विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली. १६ ते ३१ जुलै यादरम्यान ९८ हजार ६ घरांची तपासणी करण्यात आली. यात ५ हजार ९२९ घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आल्या. तर, १ ते २४ ऑगस्टदरम्यान ८७ हजार १६७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३,८७२ घरे डेंग्यू दूषित आढळून आली. या घरांमुळे डेंग्यूचे रुग्ण वाढत असतानाही प्रशासन केवळ तपासणीपलीकडे जात नसल्याचे चित्र आहे. कठोर किंवा दंडात्मक कारवाई होत नसल्याने दूषित आढळून आलेल्या घरांमध्ये पुन्हा डेंग्यू अळी दिसून येत आहे. यामुळे डेंग्यूवर नियंत्रण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपूर शहरात जानेवारी ते आतापर्यंत डेंग्यूच्या ४४२ रुग्णांची नोंद झाली आहे. यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या रोगाला धोक्याच्या मिठीत ढकलले जात असले तरी प्रशासन मात्र सर्वेक्षणातच व्यस्त आहे.