गुन्हे शाखेची कारवाई : संबंधितांचे धाबे दणाणलेनागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे एका वित्तीय संस्थेला ९५ लाखांचा गंडा घालण्याच्या आरोपाखाली गुन्हेशाखेच्या पथकाने किरण नामदेव महल्ले (वय ३३) याला अटक केली. महल्लेची नरेंद्रनगरात अॅडव्हान्स कार्गो अॅन्ड पेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे. श्रीराम फायनान्स कंपनीच्या धरमपेठ शाखेत महल्लेने बनावट कागदपत्रे सादर करून ९५ लाखांचे कर्ज उचलले. कर्जाची रक्कम थकल्यानंतर फायनान्स कंपनीने चौकशी सुरू केली. नंतर महल्लेची बनवाबनवी उघड झाली. या प्रकरणी श्रीराम फायनान्सतर्फे जून महिन्यात अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. आरोपी म्हणून किरण महल्ले, त्याची पत्नी अश्विनी आणि भागीदार नरेश खंडवाणीसह सहा जणांचे नाव तक्रारीत नोंदवण्यात आले. अंबाझरी पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर गुन्हेशाखेच्या आर्थिक पथकाचे सहायक निरीक्षक प्रदीप लांडे यांच्याकडे चौकशीची सूत्रे आली. त्यांनी महिनाभरापासून या प्रकरणाची बारीकसारीक तपासणी केली. अनेकांचे बयाण नोंदवले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी मुख्य आरोपी किरण महल्ले याला अटक करण्यात आली. या फसवणूक प्रकरणात वित्त संस्थेशी संबंधित काही जण सहभागी असावे, असा पोलिसांना संशय आहे. मुख्य आरोपीला अटक झाल्यामुळे आता संबंधितांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)
९५ लाखांची फसवणूक सूत्रधार गजाआड
By admin | Updated: August 14, 2014 01:21 IST