The 8th Lokmat postponed the 'Sur Jyotsna National Music Award' ceremony | आठवा लोकमत ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलला

आठवा लोकमत ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलला

नागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक, संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांचा स्मृतिदिवस २३ मार्च रोजी असतो. त्यानिमित्ताने दरवर्षी लोकमत ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ दिला जातो. यावर्षी २३ मार्च रोजी नागपुरातील सुरेश भट सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने हा सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयोजन समितीचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी कळविले आहे.

या पुरस्कारासाठी संगीत क्षेत्रातील दिग्गज मान्यवर राष्ट्रीय नवोदित गायकांची, वादकांची निवड करतात. गेल्या सात वर्षांत सूर ज्योत्स्ना मंचने अनेक नवोदित आणि प्रतिभाशाली गायक, वादक यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. २०२० चा सोहळा १६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात नुकताच पार पडला.

नागपुरातही हा सोहळा मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यांपासून नागपूरसह विदर्भात कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत असून सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. राज्य सरकारसह प्रशासकीय यंत्रणाही उपाययोजनांच्या कामी लागली आहे. अशात प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे हे जास्त महत्त्वाचे आहे. या जबाबदारीच्या जाणीवेतून यावर्षी २३ मार्च रोजी होऊ घातलेला हा सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला आहे.

Web Title: The 8th Lokmat postponed the 'Sur Jyotsna National Music Award' ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.