८५ वर्षाचा वन तपस्वी

By Admin | Updated: January 4, 2017 02:02 IST2017-01-04T02:01:20+5:302017-01-04T02:02:20+5:30

४० वर्षे एखाद्या तपस्व्याप्रमाणे अरण्यात राहून सर्व घटकांचा सूक्ष्म अभ्यास करून त्याला साहित्याच्या रूपात

85 years old forest worshiper | ८५ वर्षाचा वन तपस्वी

८५ वर्षाचा वन तपस्वी

नागपूर : ४० वर्षे एखाद्या तपस्व्याप्रमाणे अरण्यात राहून सर्व घटकांचा सूक्ष्म अभ्यास करून त्याला साहित्याच्या रूपात वाचकापुढे मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना वनांचा विकिपीडियाच म्हणता येईल. या वनतपस्वींना आज महाराष्ट्र शासनातर्फे विंदा करंदीकर पुरस्कार जाहीर झाला.
अरण्यातील झाडे, प्राणी, पक्षी, कीटक, फुलपाखरे यांचे जगणे चितमपल्ली यांनी अनुभवले आणि हे अनुभव त्यांनी साहित्याच्या माध्यमातून विविध पुस्तकांच्या रूपात प्रकट केले. रानवाटा, केशराचा पाऊस, पाखरमाया, चकवाचांदण, चैत्रपालवी, जंगलाचे देणे यासारख्या अनेक पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली. निव्वळ अनुभवच लिहिले नाही, तर जंगल कसे टिकले, वन्यजीवांचा अधिवास कसा सुरक्षित राहील याचे सूक्ष्म अध्ययन त्यांनी केले. यापूर्वी निसर्ग अनेक साहित्याच्या लेखणीतून पात्राच्या रुपात आला. परंतु चितमपल्ली हे फक्त निसर्ग साहित्याच्या रुपात आणणारे एकमेव साहित्यिक ठरले. त्यांनी पक्षिकोश लिहिला ज्यात शेकडो पक्षांची मराठीतील नाव व इत्थंभूत माहिती या कोशात दिली. त्यांचे आजपर्यंत प्रकाशित झालेल्या साहित्यातून १ लाखावर शब्द मराठी भाषेला मिळाले आहे, जे मराठीच्या कुठल्याही कोशात नाही. लवकरचा त्यांचा प्राणिकोश प्रकाशित होणार आहे. ८५ व्या वर्षात पदार्पण केलेले मारुती चितमपल्ली यांचे सध्या मत्स्यकोश व वृक्षकोशावर संशोधन व अध्ययन सुरू आहे. मत्स्यकोशासाठी त्यांनी जवळपास ६५० वर माशांची माहिती संकलित केली आहे. वनांचा वारसा पुढे टिकवावा, यासाठी पुढे यायला हवे, जंगलात राहून अनुभव घ्यायला हवा, असे ते सांगतात.

Web Title: 85 years old forest worshiper