राज्यात ५०० वाळू साठे उपलब्ध, तुटवडा लवकरच संपणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
By आनंद डेकाटे | Updated: October 25, 2025 20:37 IST2025-10-25T20:37:14+5:302025-10-25T20:37:51+5:30
Nagpur : सरकारने ‘एम-सॅंड पॉलिसी’द्वारे कृत्रिम वाळू निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. प्रत्येक जिल्ह्यात ५० एम-सॅंड क्रशर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत.

500 sand reserves available in the state, shortage will end soon; Revenue Minister Chandrashekhar Bawankule
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील वाळू तुटवडा पुढील पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महसूल विभागाने साडेतीनशे वाळू घाटांच्या लिलावाची तयारी केली असून, सध्या राज्यभरात ५०० हून अधिक वाळू साठे उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महसूल मंत्री बावनकुळे प्रसार माध्यमांशी नागपुरात बोलत होते. दरवर्षी ३० जून ते ३० सप्टेंबर या काळात राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार वाळू उत्खनन बंद ठेवावे लागते. त्यामुळे सध्या तात्पुरता तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, पुढील १५ दिवसांत वाळू मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने ‘एम-सॅंड पॉलिसी’द्वारे कृत्रिम वाळू निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. प्रत्येक जिल्ह्यात ५० एम-सॅंड क्रशर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत. नैसर्गिक वाळूवरील अवलंबन कमी करून स्थायी उपाययोजना राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
महानगरपालिका निवडणुका महायुतीतच
महानगरपालिका निवडणुकीत जागावाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून निर्णय घेतील. विधानसभेप्रमाणेच समन्वयाने आणि योग्यतेने जागावाटप होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री स्वत:चौकशी करणार
महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणी मुख्यमंत्री स्वतः चौकशी करतील, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. तसेच बोगस ओबीसी दाखले घेतलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई होईल. भंडारा जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराच्या तक्रारीत तथ्य असल्याचे त्यांनी सांगत, संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी सुरू असल्याचेही स्पष्ट केले.