बालसुधार गृहातून ३० मुले पळाली

By Admin | Updated: April 25, 2016 02:33 IST2016-04-25T02:33:01+5:302016-04-25T02:33:01+5:30

जरीपटक्यातील बाल सुधार गृहाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून ३० मुले पळून गेली.

30 children escaped from the Juvenile home | बालसुधार गृहातून ३० मुले पळाली

बालसुधार गृहातून ३० मुले पळाली

कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात तिखट फेकले; मारहाणही केली
नागपूर : जरीपटक्यातील बाल सुधार गृहाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून ३० मुले पळून गेली. पळून गेलेल्यात अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
जरीपटक्यातील पाटणकर चौकात हे शासकीय बाल सुधार गृह आहे. तेथे अनाथ, पोलिसांना सापडलेली तसेच विविध गुन्ह्याच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विधी संघर्षग्रस्त (अल्पवयीन) मुलांना ठेवले जाते. सकाळी आणि रात्री जेवणाच्या वेळी त्यांना पुरती मोकळीक मिळते. रविवारी रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास जेवणाची तयारी सुरू असताना त्यांना नेहमीप्रमाणे एकत्रित करण्यात आले. यावेळी बाल सुधार गृहात सुरक्षा रक्षकासह मोजकेच कर्मचारी होते. ही संधी साधून काही मुलांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि काहींनी कर्मचाऱ्यांना बेदम चोप देत सुधार गृहातून पलायन केले. तब्बल ३० मुले सुधार गृहातून पळाल्याने हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी सुधार गृहाच्या व्यवस्थापकांना कळविले. त्यांनी जरीपटका पोलिसांना माहिती दिली. जरीपटका पोलिसांनी वायरलेसवरून शहरातील सर्व ठाण्यांना माहिती देऊन संशयास्पद अवस्थेत दिसणाऱ्या मुलांना पकडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर हादरलेल्या शहर पोलीस यंत्रणेने विविध भागात कसून तपास सुरू केला. जागोजागी नाकाबंदी केली. (प्रतिनिधी)

अनेक जण चड्डी-बनियानवर
पळालेल्या मुलांमध्ये खून, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि सुधार गृहात ठेवलेल्या काही बाल आरोपींचाही समावेश आहे. जेवणाच्या वेळी अनेक मुले चड्डी किंवा बरमुडा अन् बनियानवर असतात. तशाच अवस्थेत त्यांनी येथून पळ काढला. त्यांना शोधण्याचे काम पोलीस करीत होते.


९ परतले, १० पकडले
पळून गेलेल्यांपैकी काही वेळेतच ९ मुले स्वत:हून सुधार गृहात परतली तर, १० मुलांना वेगवेगळ्या भागात पकडण्यात आले. ११ जणांचा जागोजागी शोध घेतला जात होता. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने कर्मचाऱ्यांना मारहाण करून गिट्टीखदानमधील एका सुधार गृहातून काही मुले पळून गेली होती. त्यात शहरातील सर्वच सुधार गृह, अनाथालयातून अधूनमधून मुले पळून जातात.

Web Title: 30 children escaped from the Juvenile home