लग्नाचे आमिष, अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती; आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 16:36 IST2023-02-27T16:30:18+5:302023-02-27T16:36:39+5:30
रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता तेथे ती गर्भवती असल्याची माहिती तिच्या आईला कळली

लग्नाचे आमिष, अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती; आरोपीस अटक
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीस वाडी पोलिसांनी अटक केली आहे.
अमन विजय ठाकरे (२१, वाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मजुरी करतो. अल्पवयीन १५ वर्षांची विद्यार्थिनी दहावीला शिकते. तिची आई मोलमजुरी करते. एकाच कॉलनीत राहत असल्यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीची आरोपीसोबत ओळख झाली. त्यांचे एकमेकांसोबत बोलणे सुरू झाले. आरोपीने तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला विश्वासात घेतले. मी तुझ्या सोबतच लग्न करीन, असे आमिष दाखविले.
आरोपीने नोव्हेंबर २०२२ ते २५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान तिला आपल्या राहत्या घरी नेऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिच्या आईने तिला रुग्णालयात नेले असता तेथे ती गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती तिच्या आईला कळली. याप्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सूचनेवरून आणि अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वाडी ठाण्याचे उपनिरीक्षक विजेंद्र नाचन यांनी आरोपी अमन विरुद्ध कलम ३७६, ३७६ (२), (एन) (जे), सहकलम ४, ८, १२ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास वाडी पोलिस करीत आहेत.