एकाच दिवशी अडीच लाख प्रवासी; बाबांच्या अनुयायांची रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी
By नरेश डोंगरे | Updated: October 3, 2025 20:39 IST2025-10-03T20:38:39+5:302025-10-03T20:39:10+5:30
शिस्तबद्ध सेवा, अनेकांकडून मदतीचा हात : रेल्वे पोलीस, आरपीएफकडून सेवा अन् सुरक्षा

2.5 lakh passengers in a single day; Huge crowd of Baba's followers at railway stations
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैचारिक क्रांतीची प्रेरणा आणि समतेचा संदेश घेण्यासाठी दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांनी गुरुवारी रात्रीपासून परतीचा मार्ग धरला. त्यामुळे रात्रीपासून नागपूरचे मुख्य रेल्वे स्थानक, ईतवारी तसेच अजनी रेल्वे स्थानक बाबांच्या अनुयायांनी अक्षरश: फुलून गेेले होते.
विशेष म्हणजे, रोज सुमारे ७० हजार प्रवाशांची वर्दळ अनुभवणाऱ्या मुख्य आणि अजनी या दोन रेल्वे स्थानकावर गुरुवारी एकाच दिवशी तब्बल अडीच लाख प्रवासी जमले होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे औचित्य साधून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर लाखो भाविक येतात. देशाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांपैकी लाखो अनुयायी रेल्वेने येतात. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेता रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलांनी आधीच व्यवस्था तसेच बंदोबस्ताचे नियोजन केले होते. त्यानुसार, मुख्य रेल्वे स्थानक, अजनी रेल्वे स्थानक, ईतवारी आणि कामठी रेल्वे स्थानकावर गेल्या तीन दिवसांपासून पिण्याचे स्वच्छ पाणी, थांबण्यासाठी, आरामासाठी तात्पुरते निवारे, मेडिकल कॅम्पची उभारणी करण्यात आली होती. नागपुरात येण्यासाठी आणि येथून जाण्यासाठी प्रत्येकी १२ अशा एकूण २४ स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. सेवाभावी आणि स्वयंसेवी संस्था, संघटनांकडून मोफत भोजनदान, पिण्याचे पाणी दिले जात होते. त्यामुळे लाखोंच्या संख्येत आलेल्या बाबांच्या अनुयायांना सोयीचे झाले. प्रवाशांना मार्गदर्शन तसेच स्वच्छतेसाठी अतिरिक्त ५०० कर्मचारी नेमण्यात आल्याने साफसफाईसुद्धा चांगली राहिली.
उल्लेखनीय असे की, नागपूरच्या मुख्य आणि अजनी या दोन रेल्वे स्थानकांवर दरदिवशी साधारणत: ६५ ते ७० हजार प्रवासी येतात, जातात. मात्र, यावेळी दसऱ्याच्या दिवशी गुरुवारी एकाच दिवशी तब्बल अडीच लाख प्रवासी या दोन रेल्वे स्थानकांवर आले. मात्र, पूर्व नियोजन असल्यामुळे कुठलीही गडबड अथवा गोंधळ झाला नाही.
यावर्षी विशेष चॅलेंज होते : सिनियर डीसीएम
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नागपूरच्या मुख्य आणि अजनी या दोन्ही रेल्वे स्थानकांवर वेगवेगळी विकास कामे सुरू असल्यामुळे बरीचशी जागा व्यापली आहे. त्यामुळे यावर्षी रेल्वे प्रशासनापुढे विशेष आव्हान होते. मात्र, संभाव्य अंदाज घेऊन नियोजन केल्यामुळे लाखोंच्या संख्येत प्रवासी येऊनही सर्व काही सुरळीत झाले, अशी माहितीवजा प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे सिनियर डीसीएम अमन मित्तल यांनी दिली.