दबाव व पैशाच्या जोरावर निकालाआधीच भाजपचे १०० नगरसेवक बिनविरोध ; सुजात आंबेडकर यांचा आरोप
By आनंद डेकाटे | Updated: December 1, 2025 16:00 IST2025-12-01T15:58:24+5:302025-12-01T16:00:13+5:30
सुजात आंबेडकर यांचा आरोप : आरएसएस ही अनोंदणीकृत दहशतवादी संघटना

100 BJP corporators elected unopposed even before the results due to pressure and money; Sujat Ambedkar alleges
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांवर दबाव टाकून किंवा त्यांना पैशाचे आमीष देऊन मतदानापूर्वीच भाजपचे त्यांचे १०० नगरसेवक हे बिनविराेध निवडून आणले, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी येथे केला. ते सोमवारी नागपुरात पत्रपरिषदेत बोलत होते.
सुजात आंबेडकर म्हणाले, नगरपरिषद व नगर पंचायतच्या निवडणुका सुरू आहेत. परंतु दोन आठवड्यापूर्वीच भजपचे १०० नगरसेवक निवडून कसे येतात? हे लोकशाहीसाठी घातक आहे. भाजपने या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला. सर्वसामान्यांसाठी ही निवडणूक राहिलीच नाही. पैशासोबतच दबाब तसेच संपूर्ण यंत्रणेचा वापर केला. जो पैसा खर्च करेल किंवा भाजपला साथ देईल, तोच उमेदवार निवडणूक लढवू शकेल. एखादा सामान्य माणूस निवडणुकीत उतरलाच तर तो टिकणार नाही, अशी व्यवस्थाच भाजपने निर्माण केली आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे,असे ते म्हणाले.
आरएसएस ही अनोंदणीकृत दहशतवादी संघटना असल्याची टीका करीत सुजाात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आरएसएसवर प्रहार केला. ते म्हणाले छत्रपती संभाजीनगर येथील आरएसएस कार्यालयावर वंचितने मोर्चा काढला. तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी भारताचे संविधान, भाराताचा राष्ट्रीय ध्वज आणि महाराष्ट्र पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्ट या तीन गोष्टी घेऊन गेलो होतो. परंतु या तिन्ही गोष्टी आरएसएसने स्वीकारल्या नाहीत. याचाच अर्थ त्यांना भारताचे संविधान मान्य नाही. भारताचा झेंडा मान्य नाही तसेच ती संघटना नोंदणीकृत नाही. त्यामुळे या तिन्ही गोष्टी जोपर्यंत आरएसएस मान्य करीत नाही, तोपर्यंत त्यांच्याविरोधातील लढा सुरूच राहील. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे म्हणतात भारताची ओळख ही हिंदू धर्म आहे. परंतु भारताची ओळख ही हिंदू नसून भारतीय व भारताचे लोक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नांदेडमध्ये काॅँग्रेसने पुन्हा एकदा धोकेबाजी केली
वंचित बहुजन आघाडीने नांदेडमध्ये काॅंग्रेससोबत युती करून मैत्रीचा हात पुढे केला होता. परंतु काॅंग्रेसने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा वंचितसोबत धोकेबाजी केल्याचे सांगत सुजात आंबेडकर यांनी बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर हे काॅंग्रेससोबत युती का करीत नाहीत? ते नांदेडच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे सांगितले. अकोलामध्ये
ही धोकेबाजी सातत्याने दिसून येते,असेही ते म्हणाले.