झॉम्बी- पत्रकारितेमध्ये हे लचके तोडणे कुठून घुसले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 06:02 AM2020-09-27T06:02:00+5:302020-09-27T06:05:05+5:30

टीव्ही रिपोर्टर्स सध्या जसे वागत आहेत  ते पाहून भीती, दु:ख वा दोन्ही वाटू शकते.  संतापही येऊ शकतो. पण ही  साथीच्या रोगाला अनुकूल अर्थव्यवस्था आहे. 

Where is Indian TV journalism going?... | झॉम्बी- पत्रकारितेमध्ये हे लचके तोडणे कुठून घुसले?

झॉम्बी- पत्रकारितेमध्ये हे लचके तोडणे कुठून घुसले?

Next
ठळक मुद्देआज भारताची लोकसंख्या एकशेएकोणतीस कोटी नव्वद लाख आहे आणि भारतीयांकडे चाळीस कोटी कॅमेरे आहेत. इतके जास्त कॅमेरे असणार्‍या लोकसंख्येत शिकलेसवरलेले लोकही छापलेले शब्द वाचायचे सोडून व्हिडिओच पहातात. 

- राहुल बनसोडे

इंग्रजी चित्रपटांमध्ये झॉम्बी सिनेमा नावाचा एक प्रकार असतो. काही कारणांमुळे माणसांच्या मेंदूवर परिणाम होतो आणि ते चवताळल्यासारखे रस्त्यावर इतस्तत: फिरू लागतात, समोर दिसेल त्याच्या नरडीचा घोट घेऊ पहातात, त्यांच्यातले माणूसपण जाऊन फक्त जनावर शिल्लक राहाते आणि ह्या जनावरांना उरलेल्या माणसांची भाषाच समजत नसल्याने ते नरभक्षक बनतात. तसे पहाता झॉम्बी मुव्ही हा फक्त मनोरंजनाचा भाग आहे; पण विषाणूंचे प्रदूषण झाले आणि समाजव्यवस्था कोसळली तर खूप मोठय़ा संख्येने माणसे अशी नरभक्षक बनू शकतात ज्याला ‘झॉम्बी अपोकोलिप्स’ म्हणतात. एरव्ही ही समजूत हास्यास्पद वाटली असती; पण सध्या भारतीय टीव्ही माध्यमांचे टीव्ही रिपोर्टर्स जसे वागत आहे ते पहाता भारतीय टीव्ही रिपोर्टिंग हे सध्या झॉम्बी अपोकोलिप्सच्या प्रारंभिक पायरीवर आहे असे दिसते.
भारतीय टीव्ही चॅनलचे रिपोर्टर्स बातमी असेल तिथे गर्दी करतात. मुळात तिथे बातमी आहे हे त्यांना स्वत:हून गवसलेले नसते. बर्‍याचदा त्यांना त्या ठिकाणी धाडण्यात आलेले असते. बातमी घेत असताना, मिळवत असताना सामाजिक अंतर पाळलं जात असल्याचंही बर्‍याचदा दिसत नाही. मुंबईतल्या लोकलपेक्षाही जास्त गर्दी करीत फुटेज मिळवण्याचा प्रय} तिथे होताना दिसतो. या गर्दीत बहुतांश पुरुष असतात आणि अनेकदा बाइट घेण्याच्या नादात अक्षरश: चेंगराचेंगरी होत असते. कधीकधी तर हमरीतुमरीचेही प्रसंग येतात. त्या गर्दीत काहीवेळा स्रियाही बघायला मिळतात. सर्व जण त्या गर्दीचाच जणू भाग झालेले असतात. हे असे प्रसंग टीव्हीवर पाहताना आवाज म्युट केला आणि स्क्रीनवरच्या अक्षरांकडे दुर्लक्ष केले तर मागे उरलेली हलती चित्रे ही आपल्या देशातल्या पुरुषी अहंकाराचे जणू चित्र आहे की काय असे वाटते. 
या बातम्यांचा परतावा मग टीव्ही रिपोर्टर्सना मासिक पगाराच्या रूपात दिला जातो. काहीजण अशा बातम्या देण्यात जास्त यशस्वी झालेले असतात. त्यामुळे त्यांना थोडाफार बोनसही मिळतो; पण त्यांना कधीही वाजवीपेक्षा जास्त पगार दिला जात नाही. कारण असे केल्यास त्यांची ‘बातमी देण्याची’ क्षमता कमी होते.
टीव्ही रिपोर्टर्स जसे वागत आहेत ते पाहून भीती वा दु:ख वा दोन्ही वाटू शकते. संतापही येऊ शकतो. पण ही साथीच्या रोगाला अनुकूल झालेली अर्थव्यवस्था आहे. साथीचा रोग हा एकदा व्यापाराचा मुख्य केंद्र बनला की त्यातून पैसे कसे कमवायचे हे लोकांना हळूहळू समजायला लागते वा नाइलाजास्तव इतर कुठल्या मार्गाने पैसा कमाविणे शक्य नसले तर लोक अशा विटाळलेल्या धंद्यात उतरतात.
देशात सध्या काही ठिकाणी वापरून फेकलेल्या पीपीई किट्सची जबाबदारीने विल्हेवाट न लावता त्या किट्स पाण्याने स्वच्छ करून पुन्हा बाजारात विकण्याचे प्रकार होत असल्याच्या अनधिकृत बातम्या येत आहेत. असे वापरून फेकलेले दूषित किट्स गोळा करणारे काही हात आहेत, ते स्वच्छ करणारे काही हात आहेत आणि ते पुन्हा पॅक करणारेही काही हात आहेत. हे काम गटारीच्या चेंबरमध्ये उतरून सफाई करण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे आणि तरीही पोटासाठी काही लोक हे काम करतायेत. केवळ पोटाची खळगी भरण्याकरिता माणसांना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन काम करावे लागत असेल तर मग फक्त टीव्ही रिपोर्टर्सला दोष का द्यावा?
एक देश म्हणून आपली टीव्ही माध्यमे अशा भयंकर परिस्थितीपर्यंत कशी येऊन पोहोचली? एकोणिसशे त्र्याऐंशी साली भारताची लोकसंख्या सत्तर कोटी होती आणि तेव्हा भारतात दहा लाख कॅमेरे होते. आज भारताची लोकसंख्या एकशेएकोणतीस कोटी नव्वद लाख आहे आणि भारतीयांकडे चाळीस कोटी कॅमेरे आहेत. इतके जास्त कॅमेरे असणार्‍या लोकसंख्येत शिकलेसवरलेले लोकही छापलेले शब्द वाचायचे सोडून व्हिडिओच पहातात. 
शब्द वाचण्यासाठी लागणारी थोडीशी मेहनत घेण्याची त्यांची तयारी नसते आणि आळशीपणातून सर्व माहिती मिळविण्यासाठी ते टीव्हीवरती अवलंबून राहातात. टीव्हीच्या न्यूज चॅनलवर दिसणारी हिंसक दृश्ये आणि भांडणे सतत पहात राहिल्यास त्याचा परिणाम शेवटी समाजावर होतो आणि असा समाज अस्थिर झाल्यास त्याचे अस्तित्वच धोक्यात येते. असा समाज स्वत:ला नष्ट होण्यापासून वाचवू शकत नाही.
गेल्या पाच हजार वर्षांत अनेक ठिकाणी अनेक वेळा समाजव्यवस्था कोसळली; पण तिची कधीही कुठेही बातमी झाली नाही. समाजव्यवस्था कोसळण्याची बातमी होत नाही कारण अशी बातमी लिहिण्यासाठी, चित्रित करण्यासाठी, वाचण्यासाठी वा पहाण्यासाठी समाजच शिल्लक राहात नाही.

rahulbaba@gmail.com
(लेखक समाजमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Where is Indian TV journalism going?...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.