प्रा. डॉ. द. ता. भोसले
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}सदर लेखनातील हा शेवटचा लेख. वाचकांचा कृतज्ञतापूर्वक निरोप घेण्याचा, वाचकांना धन्यवाद देण्याचा आणि त्यांचे आभार मानण्याचा!
गेले वर्षभर मी ‘थोडं गोड आणि थोडं कडू’ या सदरासाठी शिक्षण आणि त्याच्याशी निगडित असलेले सारे घटक यांच्यातील भले-बुरे, कडू-गोड आणि ज्ञात-अज्ञात असे अनुभव आपल्यासमोर ठेवत गेलो. आपले शिक्षण हा आता माणसाचा बहिश्चर प्राण झालेला आहे. जीवनातील जडण-घडणीचा तो एक प्राणभूत घटक मानला जातो आहे. आज माणसाजवळ असलेल्या धनशक्ती, जनशक्ती, पदशक्ती अथवा शस्त्रास्त्रशक्तीपेक्षाही ज्ञानशक्ती मोठी मानली जाते. ही ज्ञानशक्ती ज्याच्याकडे प्रबळ, प्रगत नि परिपूर्ण तो माणूस इतरांवर अधिराज्य गाजवू शकतो. तो देशही जगावर अधिराज्य गाजवू शकतो. म्हणून अशा या मौलिक व प्राणभूत घटकाचे तेज वाढावे, त्यातील विकृती कमी व्हावी, त्याच्या प्रकाशात अंधार पळून जावा आणि त्याचे चैतन्यमय, प्रकाशमय आणि निरामय रूप सर्वांना प्राप्त व्हावे या एका भावनेने शिक्षणाचे जे पाच प्रमुख घटक आपण मानतो त्यांचे कृष्ण-धवल दर्शन मी घडवीत गेलो. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासन आणि समाज हे ते पाच घटक होत. याची वाईट बाजू आणि चांगली बाजू मला जशा भावल्या तशा मांडल्या.
शिक्षणाच्या क्षेत्रात मी वेगवेगळ्या नात्यांनी बत्तीस वर्षे वावरलो. रमलो. विद्यार्थ्यांपासून समाज अन् शासन पातळीवर सार्या घटकांशी एकरूप होऊन मी जगलो त्यामुळे सगळ्यांचे नाना परीचे अनुभव मी घेतले आहेत. या माझ्या अनुभवांनाच मी कल्पितांची अंशत: जोड देत त्यातले हे सत्य नि सार्मथ्य वाचकांसमोर ठेवले. त्यातली कुरुपता आणि स्वार्थ अधोरेखित केला. तसे म्हटले तर हे सारे अनुभव आजही अवती-भोवती पाहावयास मिळतात. वाचकांच्या अनुभवाला येत असावेत. त्यामुळेच या माझ्या सदर लेखनाला महाराष्ट्राच्या सर्व विभागांतून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातच या दैनिकाच्या रविवार आवृत्तीचे वितरण सर्वदूर आणि मोठय़ा संख्येने होत असल्याने चंद्रपूरपासून तो कर्नाटकाच्या सीमेवरील चंदगडपर्यंतच्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. फोन करून आणि समक्ष भेट देऊनही या सदर लेखनातील एकेक पात्र अन् एकेक प्रसंग म्हणजे व्यामिश्र जीवनाचा घडविलेला अनोखा साक्षात्कार होय असेही काही वाचकांना वाटले. ‘‘कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणासाठी जिद्दीने झुंजणार्या मुलांचा आम्हाला पत्ता कळवा आम्ही त्याला मदत करणार आहोत’’ असे फोनही मला अनेकांनी केले; यापेक्षा वाचकांच्या प्रतिक्रियांची महत्ता दुसरीकडे बघायला नको, असेच मला वाटते. ‘लोकमत समूहा’ने ही संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. मुख्य म्हणजे वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. महाकवी तुकोबारायांच्या भाषेत एवढेच म्हणेन की, ‘शेवटचा दिस गोड व्हावा’.. तो गोड झाला याचाच खरा आनंद!
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व नवृत्त प्राचार्य आहेत.)
(समाप्त)