शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

‘गुलाब’ जलाचा मारा वेदनादायी

By किरण अग्रवाल | Published: October 03, 2021 11:01 AM

Crop loss due to heavy Rain : केवळ पिकेच हातची गेली असे नाही तर पाऊस असा धो-धो बरसला व नदीनाल्यांना पूर आले, की शेतातील जमीनही खरडून गेली.

- किरण अग्रवाल

गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणून ठेवले आहे, परंतु ज्यांनी मदत मिळवून द्यायची ते राजकारणी पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता नुकसानीच्या पंचनाम्याची पारंपरिक वाट न धरता तातडीने थेट मदतीची गरज आहे.

 

निसर्गाने मारले तर राजाने तारावे अशी प्रजाजनांची रास्त अपेक्षा असते, पण राजाचे प्रधान म्हणा अगर प्रतिनिधी; ते निवडणुका आणि राजकारणात मश्गूल असल्यावर अपेक्षा कोणाकडून करायची? दुबार, तिबार पेरणी करून कसातरी हातातोंडाशी आलेला घास अलीकडच्या मुसळधार पावसाने हिरावून नेला म्हटल्यावर वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आता पाण्याची संततधार लागली असून मायबाप सरकारची गतिमानता अजून काही दिसून येऊ नये हे दुर्दैवीच म्हणायला हवे.

 

साडेसाती वगैरे प्रकारांवर विश्वास ठेवणे समर्थनीय ठरूच शकत नाही, परंतु कधी कधी काही गोष्टी अशा घडून येतात की क्षणभर तो विचार मनात डोकावून जातो खरा. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाशी मुकाबला सुरू असतानाच निसर्ग चक्रीवादळ व अवकाळीच्या पाठोपाठ गुलाबी चक्रीवादळामुळे अलीकडेच झालेल्या धुवाधार पावसाने मोठ्या प्रमाणात जे नुकसान घडून आले ते पाहता, काय साडेसाती लागलीय कुणास ठाऊक असाच अंधश्रद्धीय प्रश्न पडावा. निसर्गाच्या सततच्या माऱ्यामुळे त्रासलेल्या बळीराजाला यंदा समाधानकारक पावसामुळे काहीसे अच्छे दिन येण्याची चिन्हे होती, मात्र काढणीला आलेला सोयाबीन, भुईमूग, कापूस आदी पिके नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने भुईसपाट करून ठेवलीत. बरे, केवळ पिकेच हातची गेली असे नाही तर पाऊस असा धो-धो बरसला व नदीनाल्यांना पूर आले, की शेतातील जमीनही खरडून गेली. त्यामुळे उद्या त्या जमिनीत काय पिकवायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

आपल्याकडे मंगल कार्याप्रसंगी गुलाब जल शिंपडण्याची प्रथा आहे. त्यामुळे सुवासिकता व प्रसन्नतेचा अनुभव येतो, परंतु ‘गुलाब’ नावाच्या चक्रीवादळामुळे ज्या जलधारा कोसळल्या त्यामुळे वेदनांचे भळभळून वाहणे स्वाभाविक ठरले आहे. पिकांचे, जमिनीचे नुकसान तर झालेच, काही जणांचे पशुधनही वाहून गेले. आपल्याकडे म्हणजे पश्चिम वऱ्हाडात अकोला, वाशिम सोबतच सर्वाधिक नुकसान बुलडाणा जिल्ह्यात झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत, परंतु त्यांची गती व स्थिती काय असते हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. ई पीक पाहणीसारख्या अतिशय चांगल्या योजनेचे तांत्रिक अडचणींमुळे तसेच योग्य प्रशिक्षणाअभावी कसे मातेरे होते आहे हे आपण पाहतो आहोतच, तेव्हा नुकसानग्रस्तांबाबत पंचनामे व अहवालांचे सोपस्कार पार पाडण्याऐवजी थेट मदतीचे पॅकेज घोषित केले तर दिलासा मिळू शकेल. नाहीच काही तर पीक कर्ज काढलेल्या नुकसानग्रस्तांचे ते कर्ज तरी तातडीने माफ करायला हवे. पीक विमा काढलेल्या कंपन्यांना शेतीच्या बांधावर पाठवून तातडीने त्याची नुकसान भरपाई मिळवून द्यायला हवी.

 

अर्थात, कुठलीही मदत अगर नुकसान भरपाई सहज मिळणारी नाही. त्यासाठी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आग्रह व पाठपुरावा गरजेचा आहे. दुर्दैव असे, की जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत ही मंडळी व्यस्त आहे, त्यामुळे मदत मिळवून देणे दूर; साधे शेतकऱ्यांच्या दारी जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याची तसदी अनेकांनी अजून घेतलेली दिसत नाही. पोटनिवडणुकीसाठी मते मागायला येणाऱ्या पुढाऱ्यांना याचा जाब विचारण्याची हिंमत मतदारांनी दाखविली तर अनेकांची अडचण होईल. आताचे नुकसान आहेच आहे, पण मागच्याही नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही. त्याचे काय? यावर कुणी बोलताना दिसत नाही.

 

सारांशात, दसरा - दिवाळी तोंडावर असताना बळीराजाच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून सरकारी यंत्रणांना गतिमान करणे व आपद्ग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देणे गरजेचे बनले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस