Join us  

तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

By अतुल कुलकर्णी | Published: April 30, 2024 4:44 AM

आमदारांची संख्याही कमी झाली

अतुल कुलकर्णी

मुंबई : २००९ पासून आतापर्यंत तीन विधानसभा निवडणुका झाल्या. प्रत्येक वेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांची टक्केवारी कमी होत गेली आहे. तरीही भाजप आणि शिंदे गटाला राज ठाकरे आपल्यासोबत आले पाहिजेत, असे का वाटते हा मिलियन डॉलर क्वेश्चन बनला आहे. राज ठाकरे यांनी ४ मे रोजी कणकवलीत सभा घेण्याचे नारायण राणे यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांची मूक उपस्थिती होती.

असे असले तरी मुंबईत मात्र मनसेने स्वतःच्या आवडीनिवडी सांगणे सुरू केले आहे. संजय निरुपम, रविंद्र वायकर हे उमेदवार म्हणून आम्हाला चालणार नाहीत असे मनसेने आधीच स्पष्ट केले आहे. २००९ मध्ये राज ठाकरे यांनी १४३ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १३ विजयी ठरले. तेव्हा मनसेची मतांची टक्केवारी ५.७१ होती. त्याच वर्षी कोणत्या पक्षाची किती टक्केवारी होती हे सोबतच्या टेबलवरून लक्षात येईल. पुढे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी तब्बल २१९ उमेदवार मैदानात उतरवले. मात्र फक्त एक उमेदवार विजयी ठरला. तेव्हा त्यांची टक्केवारी घसरून ३.१५ टक्के झाली. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी १०१ उमेदवार उभे केले. त्याही वेळी फक्त एकच उमेदवार विजयी ठरला.

असे असतानाही भाजप आणि शिंदे गटाला राज ठाकरे आपल्या सोबत असावे वाटतात. कारण समोर उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचा सामना आहे. भाजपने अनेक मतदारसंघांमध्ये थेट उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराशी लढत होणार नाही असेच बघितले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पराभवासाठी राज ठाकरे यांच्या इतके उत्तम शस्त्र असू शकत नाही असे भाजप नेत्यांना वाटते.

काही असले तरी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय त्यांना विधानसभेत फायद्याचा ठरतो की तोट्याचा आहे तीन महिन्यातच स्पष्ट होईल. सोबत आमदार नसले, मतांची टक्केवारी कमी झालेली असली, तरीही राज ठाकरे या नावाचा करिष्मा सभांमधून दिसून येतो. तो मतांमध्ये किती परावर्तीत होतो हे निकालानंतर कळेल.

इंजिन हे चिन्ह मी कष्टाने कमावलेले आहे, असे सांगणाऱ्या राज ठाकरे यांच्या फोटोभोवती सोमवारी निघालेल्या मिरवणुकीत धनुष्यबाण दिसत होते.

उद्धव ठाकरे यांची मराठी मते फोडू शकेल असा नेता भाजप आणि शिंदे गटाला हवा आहे. मुंबई, ठाणे, नाशिक परिसरात राज यांचा वापर करून घेता येईल, असे कदाचित त्या दोघांना वाटत असेल. एवढ्या मर्यादित कामासाठी त्यांनी राज ठाकरे यांना स्वतः सोबत घेतले आहे.

- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, शरद पवार गट

राज यांचे वाढत असलेले समर्थक आणि हिंदुत्वाचा विचार यात असणारे साम्य यामुळेच भाजप आणि शिंदे गटाने राज ठाकरे यांना सोबत येण्याची विनंती केली. ती राज ठाकरे यांनी मान्य केली. या निर्णयाचे परिणाम महाराष्ट्राला चांगल्या रीतीने पाहायला मिळतील.

- नितीन सरदेसाई, मनसे नेते 

जयंत पाटील आणि ठाकरे गटातील विश्वप्रवक्त्यांना बसल्या जागी भविष्य सांगण्याची सवय लागली आहे. त्यातून संभ्रम निर्माण करण्यापलीकडे त्यांना उरलेले नाही. त्यामुळे ते बोलत राहतील. पराभवाची भिती वाटते म्हणून ते असे बोलतात.

- शीतल म्हात्रे,  प्रवक्त्या, शिंदे गट 

मतांपेक्षा भाजप विचाराला महत्त्व देते. काही अपवाद वगळले तर राज आणि भाजपची मते जुळतात. त्यामुळे ते आमच्या सोबत आहेत. परप्रांतियांची भूमिकाही त्यांनी मवाळ केली आहे. म्हणून मोदींच्या विकास वाटेवर ते आमचे सोबती आहेत.

- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४राज ठाकरेमनसेशिवसेनामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४