आदिवासीबहुल गावातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:47 IST2025-10-02T11:46:24+5:302025-10-02T11:47:05+5:30
विद्यार्थी शिकतात अन् एकमेकांनाही शिकवतात

आदिवासीबहुल गावातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्कार
लंडन/पुणे/नाशिक : ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५ वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज कम्युनिटी चॉइस ॲवार्ड’साठी निवड केली. हा पुरस्कार कोविडकाळात ज्या शाळांनी सर्वोत्कृष्ट काम करून विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला अशा शाळांना दिला जातो.
आदिवासीबहुल खेड तालुक्यातल्या या शाळेत विद्यार्थ्यांना विषयानुकूल अभ्यासक्रम शिकवला जातो. विद्यार्थी एकमेकांनाही शिकवतात. येथील शिक्षक दत्तात्रय वारे यांनी सांगितले की, या पुरस्कारामुळे आमच्या शाळेच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. अत्यंत दुर्गम असलेल्या जालिंदरनगरच्या या शाळेत २०२२ साली केवळ तीन विद्यार्थी होते. कमी पटसंख्या असल्याने शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती. पण दोन वर्षांत या शाळेने परिवर्तन घडून आणले. दत्तात्रय वारे यांनी हे परिवर्तन केवळ पायाभूत पातळीवर झाले नाही, तर शैक्षणिक स्तरावरही हा बदल घडून आल्याचे सांगितले.
५० शाळांमधून झाली निवड
जालिंदरनगरमधील या जिल्हा परिषद शाळेची निवड ही ५० शाळांच्या यादीमधून करण्यात आली आहे. या शाळेला पुरस्कार देण्यासाठी सर्वाधिक मतदान मिळाले. ‘टी४ एज्युकेशन’ संस्था जगभरातील सुमारे १०० देशांमधील दोन लाख शिक्षकांचे प्रतिनिधित्व करीत आहे.
अबुधाबी येथे वितरण
टी फोर एज्युकेशन संस्थेच्यावतीने १५ आणि १६ नोव्हेंबरला अबुधाबी येथे वर्ल्ड स्कूल समिट होणार असून, त्यामध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. एक कोटी रुपयांचे बक्षीस आहे. ते स्वीकारण्यासाठी दत्तात्रय वारे यांच्यासह शिक्षक जाणार आहेत.
पुरस्काराच्या पाच श्रेणी
संस्थेतर्फे दिला जाणारा पुरस्कार सामाजिक सहकार्य, पर्यावरण कृती, सर्जनशीलता, आपत्तीत उल्लेखनीय कार्य व आरोग्य साहाय्य अशा पाच श्रेणींमध्ये दिला जातो.
देशाबरोबरच प्रगत देशातील शासकीय व खासगी क्षेत्रातील लाखो शाळांना मागे टाकत ही सरकारी शाळा या पातळीवर पोहोचली. सरकारी शाळांची क्षमता सिद्ध करणारी ही घटना आहे. आगामी काळात राज्यातील सर्वच शाळा या दिशेने मार्गक्रमण करतील.
दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
शाळेला मिळालेला पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे यशाचे खरे आधारस्तंभ आहेत.
गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पुणे