"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:50 IST2025-11-18T17:48:25+5:302025-11-18T17:50:09+5:30
Shiv Sena vs BJP: शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याचा मुद्दा चांगलाच तापला. भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेतीलच नेत्यांची आयात सुरू असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री थेट मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले. काय घडलं? याबद्दलच सरनाईकांनी सविस्तर माहिती दिली.

"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Pratap Sarnaik Devendra Fadnavis: शिंदेंचे मंत्री नाराज होते, याला आता दुजोरा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून शिवसेनेचेच नेते गळाला लावले जात असल्याबद्दल नाराजी त्यांनी मांडली. इतकंच नाही, तर शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीलाच गेले नाही, त्यामुळे या विषयाला तोंड फुटले. आता या विषयावर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर खुलासा केला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीला हजर होते. पण, मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री गेलेच नाहीत. त्यानंतर कल्याण-डोंबिवली, ठाणे, पालघरसह इतर काही जिल्ह्यात भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचेच नेते घेतल्याचा मुद्दा तापला.
प्रताप सरनाईक म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलो
माध्यमांशी बोलताना सरनाईक म्हणाले, "महायुतीचं सरकार आहे. एका कुटुंबातही वाद होतात. तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे मनातील भावना एक-दुसऱ्याकडे व्यक्त करायच्या असतात. मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो. आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या. मनातील भावना व्यक्त केल्यावर त्यावर तोडगाही निघाला."
ठाणे, कल्याण-डोंबिवलीत फोडाफोडी
"राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे पक्षांतराचे वारे येतात. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात असे चालू होते. प्रत्येक जिल्ह्यात पक्षांतरे होती. त्यात पालघर, सोलापूर, ठाणे आहे कल्याण-डोंबिवली आहे. अशा ठिकाणी एकमेकांना पक्षात घेण्यात चढाओढ सुरू होती. त्यामुळे नाराजी आमच्या लोकांची होती. थोडी त्यांच्या लोकांची होती. ही नाराजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं आणि त्यावर तोडगा काढला", असे प्रताप सरनाईक म्हणाले.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय झाला निर्णय?
"असा निर्णय झाला आहे की, महायुतीतील जे घटक पक्ष आहेत, त्यांनी मित्रपक्षांचे कोणतेही नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेऊ नये, अशी भूमिका ठरली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि इतर पक्षातील नेते बसून निर्णय घेतील. पण, सामोपचाराने तोडगा निघालेला आहे. कुणी कुणाला काहीही सुनावलेलं नाहीये. काही गोष्टी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही. काही कळत-नकळत घडतात. विसंवाद होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका असल्याचे ठरले आहे", असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.