पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार? CM फडणवीस करणार एकनाथ शिंदे, अजित पवारांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:22 IST2025-01-27T18:18:56+5:302025-01-27T18:22:26+5:30
Shiv Sena Shinde Group Minister Uday Samant News: नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याचे सांगितले जात आहे.

पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार? CM फडणवीस करणार एकनाथ शिंदे, अजित पवारांशी चर्चा
Shiv Sena Shinde Group Minister Uday Samant News: २०२४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठे बहुमत मिळाले. भाजपा १३२ जागांसह सर्वांत मोठा पक्ष बनला, तर शिवेसना शिंदे गटाला ५७ जागा मिळाल्या, तसेच अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. यानंतर उपमुख्यमंत्रीपदासह मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्रीपदावरून महायुतीत चांगलेच मानापमान नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. पालकमंत्रीपदावरून अद्यापही नाराजी नाट्याचा पुढील अंक सुरू असल्याचे दिसत आहे. नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदावरून शिंदेसेना आणि अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व पालकमंत्रीपदे जाहीर करण्यात आली. परंतु, नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील वाद चांगलाच वाढताना दिसत आहे. भरत गोगावले यांचा समर्थक गट शक्तिप्रदर्शन करत असून, दबावतंत्र वापरत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सुनील तटकरेंवर शेलक्या शब्दांत टीका केली जात आहे. एकीकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद चिघळत चालला असताना, दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेंच सुरू असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय घेतात, जाहीर झालेली नावे कायम राहतात की, दबावतंत्रापुढे निर्णय बदलण्याची वेळ येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीस करणार एकनाथ शिंदे, अजित पवारांशी चर्चा
पालकमंत्रीपदाच्या वादासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, दोन जिल्हे सोडले, तर बाकी सर्व ठिकाणी पालकमंत्री जाहीर झालेले आहेत. तिथे अधिकृत पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केले आहे. दोन जिल्ह्यात फक्त जी काही तू-तू, मैं-मैं सुरू आहे, त्यासंदर्भात चर्चा केली जाईल. कोस्टल रोडचे उद्घाटन झाले, त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच वाहनात होते. त्यावेळी कदाचित चर्चा झाली असेल. त्यानंतर चर्चा झाली असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार असेल. फडणवीस आणि शिंदे चर्चा करतील, तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बोलावतील आणि निर्णय घेतील, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खटके उडताना दिसत आहे. सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यात फिरू न देण्याची भाषा शिवसेना शिंदे गटाकडून केली जात आहे. भरत गोगावले यांचे समर्थक या प्रकरणी चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कसा सोडवला जातो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.