बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार की शरद पवार-ठाकरे उमेदवार देणार? महत्त्वाची माहिती समोर आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:24 IST2026-03-16T12:22:54+5:302026-03-16T12:24:18+5:30
Baramati Bypoll Election 2026: बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार की शरद पवार-ठाकरे उमेदवार देणार? महत्त्वाची माहिती समोर आली
Baramati Bypoll Election 2026: निवडणूक आयोगाने बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. ३० मार्चला अधिसूचना जारी केली जाणार आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुती प्रयत्न करत असून, विरोधक महाविकास आघाडी उमेदवार देणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाल्याने बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. तर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांना विधानसभा अथवा विधानपरिषदेपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक त्या लढविणार आहेत. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
सुप्रिया सुळे नेमके काय म्हणाल्या?
बारामतीची पोटनिवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवार असतील, अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांना बारामती पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, आम्ही बारामतीची जागा लढणार नाही, विषयच येत नाही. मी याआधी सांगितले आहे की, सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्न येत नाही. महाविकास आघाडीची बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची भूमिका नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. परंतु, संजय राऊत यांनी वेगळी भूमिका मांडली आहे.
उद्धव ठाकरे मविआ नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता
उद्धव ठाकरे विधिमंडळात जाणार आहेत. तिथे कदाचित सर्व प्रमुख पक्ष महाविकास आघाडीतील पक्षांशी चर्चा होईल. त्यानंतर एकत्रित निर्णय घेतला जाईल. जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात निवडणूक बिनविरोध व्हावी, त्यातला विरोध शब्द महत्त्वाचा आहे. अजित पवार यांच्याविषयी सद्भाव, सहानुभूती आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही बिनविरोध म्हणता, तेव्हा महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्याचे काय?, असे संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली स्पष्ट भूमिका
बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, राहुरी विधानसभेसाठी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपा उमेदवारी देण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे निवडणूक लढण्याची शक्यता आहे.