कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही; अकोटमधील आघाडीवर इम्तियाज जलील स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:06 IST2026-01-07T16:05:20+5:302026-01-07T16:06:22+5:30
'आतापर्यंत आम्ही भाजपाविरोधात राजकारण केले आहे. या भूमिकेशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही.'

कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही; अकोटमधील आघाडीवर इम्तियाज जलील स्पष्टच बोलले
अकोट: अंबरनाथ आणि अकोट येथे स्थानिक पातळीवर भाजपाने काँग्रेस आणि AIMIM सोबत आघाडी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक नेत्यांच्या या कृत्यामुळे तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जाहीर नाराजी आणि विरोध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा स्थानिक आघाड्या तोडण्याचे आदेश दिल्यानंतर, आता AIMIM नेही भाजपाबरोबर जाणार नसल्याची ठाम भूमिका मांडली आहे.
कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जाणार नाही
AIMIMचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना अकोटमधील राजकीय परिस्थितीवर स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, अकोट शहराच्या विकासासाठी ‘अकोट विकास आघाडी’ स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीत शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस यांचा समावेश आहे. त्यामुळे AIMIMलाही सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, भाजपाच्या कोणत्याही गटात AIMIM सामील होणार नाही.
एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले
इम्तियाज जलील पुढे म्हणाले, आतापर्यंत आम्ही भाजपाविरोधात राजकारण केले आहे. या भूमिकेशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. ज्या पक्षाने देशात जात-धर्माच्या नावावर तेढ निर्माण केला आहे, त्या पक्षासोबत आम्ही बसणार नाही. त्यामुळेच आमच्या पाचही नगरसेवकांना संबंधित आघाडीतून बाहेर पडत असल्याचे लेखी स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात कुठेही, कोणतीही आघाडी झाली तरी AIMIM भाजपाबरोबर जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
असदुद्दीन ओवैसी यांचीही नाराजी
या प्रकरणावर AIMIMचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचीही नाराजी असल्याचे जलील यांनी सांगितले. ते म्हणाले की, विदर्भाची जबाबदारी युसुफ अन्सारी यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, इतका महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी वरिष्ठांशी चर्चा व्हायला हवी होती. याबाबत त्यांच्याकडूनही आम्ही लेखी खुलासा मागवला आहे. विकासाचा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा असला, तरी भाजपाबरोबर जाणे आम्हाला मान्य नाही.
या आघाडीवर देवेंद्र फडणवीस नाराज
दुसरीकडे या आघाडीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि एमआयएमसोबत भाजपची युती कधीच होऊ शकत नाही, हा प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. ही आघाडी तोडावी लागेल. जर स्थानिक पातळीवर ही गोष्ट कोणी केली असेल तर ते चुकीचे आहे. हा शिस्तभंग आहे. याच्यावर कारवाई होणार. हे चालणार नाही. मी आदेश दिले आहेत आणि 100 टक्के यावर कारवाई होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.