एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:16 IST2025-11-26T17:11:35+5:302025-11-26T17:16:52+5:30
Local Body Election 2025: एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक दोघेही महायुतीचा भाग असले तरी एकमेकांना शह देण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे.

एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Local Body Election 2025: नवी मुंबई पालिकेवरील गेली २० वर्षे असलेल्या गणेश नाईक यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिंदेसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. दोघेही महायुतीचा भाग असले तरी एकमेकांना शह देण्याची एकही संधी ते सोडत नसल्याचे चित्र आहे. गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून शिंदेसेनेस डिवचल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी विजय नाहटा यांना पक्षात घेऊन जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील महाविकास आघाडीचे १२ माजी नगरसेवक गळाला लावून ताकद वाढविली आहे. यामुळे शिंदेसेना नगरसेवक फोडून गणेश नाईक यांचा वारू रोखेल काय, ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
राज्याच्या सत्तेत आणि ठाणे जिल्ह्यातील आमदार संख्याबळात भाजप मोठा भाऊ आहे. परंतु, महापालिकांमध्ये मात्र शिंदेसेनेचा बोलबाला आहे. परंतु, आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजपचा नारा गणेश नाईक यांनी दिला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई या सहा महापालिकांमध्येच फक्त आणि फक्त कमळ फुलविण्याचा भाजपाचा इरादा आहे. यातच नवी मुंबईवर सत्ता मिळवणे हे आनंद दिघे यांचे स्वप्न होते. हे स्वप्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साकार करू शकतील की, अंतर्गत गटबाजीमुळे सत्तेपासून दूर राहावे लागेल, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
दिघे साहेबांचे स्वप्न साकार होणार का?
नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिला महापौर शिवसेनेचा झाला. पण गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षाला कायम विरोधी पक्षनेते पदावरच समाधान मानावे लागले. काँग्रेससारख्या पक्षानेही पाचवेळा उपमहापौर व अनेकवेळा स्थायी समिती सभापतीपद मिळवले. सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी नाईकांनी पक्ष फोडून ते स्वप्न धुळीस मिळवले. नवी मुंबईवर सत्ता मिळवणे हे दिघे साहेबांचे स्वप्न होते. आता हेच स्वप्न साकार करायचे आहे, असा संदेश शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. दिघे साहेबांचे स्वप्न साकार होणार की, अंतर्गत गटबाजीमुळे पुन्हा सत्तेपासून दूर राहावे लागणार, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
दरम्यान, महामुंबईतील मुंबईनंतर सक्षम महापालिका म्हणून नवी मुंबई महापालिकेकडे पाहिले जाते. ही महापालिका सर्वच बाबतीत जिल्ह्यातील इतर महापालिकांपेक्षा उजवी आहे. नवी मुंबई महापालिकेवर गेली २० वर्षे पक्ष कोणताही असो, परंतु सत्ता ही नाईकांकडे आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.