अजित पवारांना महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपद का दिलं?; जयंत पाटलांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 02:02 PM2023-04-14T14:02:19+5:302023-04-14T14:08:24+5:30

राजकारणात काही गोष्टी होत असतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात असं जयंत पाटील म्हणाले.

Why was Ajit Pawar given Deputy CM post in Maha Vikas Aghadi?; Disclosure of Jayant Patil | अजित पवारांना महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपद का दिलं?; जयंत पाटलांचा खुलासा

अजित पवारांना महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपद का दिलं?; जयंत पाटलांचा खुलासा

googlenewsNext

मुंबई - राज्याच्या राजकारणात २०१९ च्या निवडणूक निकालानंतर मोठी घडामोड घडली. या निवडणुकीत एकत्र लढलेले भाजपा-शिवसेना युतीला जनतेने बहुमत दिले होते. परंतु मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षाचे बिनसले. त्यानंतर काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात अचानक पहाटे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात राज्यात पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडत सगळ्यांनाच धक्का दिला. 

अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी कुणाच्या सांगण्यावरून केला? की अजितदादा स्वमर्जीने देवेंद्र फडणवीसांसोबत गेले याबाबत अनेक प्रश्न आजही कायम आहेत. मात्र अजित पवार यांनी ७२ तासांच्या सरकारमधून बाहेर पडत महाविकास आघाडीत पुन्हा परतले आणि त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळाले हे का याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. 

जयंत पाटील म्हणाले की, पहाटेचा शपथविधी मी टीव्हीवर पाहिला. उद्धव ठाकरेंनी मला फोन केला तेव्हा मी झोपेत होतो. राजकारणात काही गोष्टी होत असतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात. अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहे. काम करण्याचा अनुभव आहे. आक्रमक आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाला त्यांची गरज आहे. ते पुन्हा पक्षात आले तेव्हा सगळ्यांनी बसून सर्व समस्यांचे निरसन केले. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवले असं त्यांनी खुलासा केला. 

त्याचसोबत अजित पवार यांनी असं का केले हे सांगण्याची गरज नाही. आम्ही सर्व एकत्रित बसलो. पवारसाहेबांनी तो निर्णय घेतला. आमच्या सगळ्यांच्या वतीने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. काही प्रश्नांची उत्तरे शोधायची नाहीत असंही जयंत पाटील म्हणाले. तर पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा मलाही शॉक बसला. मी जयंत पाटलांना फोन केला हा शपथविधी पक्षाचा आहे का? असं विचारले अशी आठवण काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितली. 

अजित पवार भाजपात जाण्याची चर्चा
अलीकडच्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपासोबत जातील अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यात अंजली दमानिया यांनी १५ आमदारांसह अजित पवार भाजपात जाणार असा दावा केला होता. त्यावर अंजली दमानिया मोठ्या नेत्या आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.  

Web Title: Why was Ajit Pawar given Deputy CM post in Maha Vikas Aghadi?; Disclosure of Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.