कशाला देता महाराष्ट्र भूषण..? वाचाळभूषण, ठोकभूषण द्या..!

By अतुल कुलकर्णी | Updated: March 16, 2025 07:28 IST2025-03-16T07:27:31+5:302025-03-16T07:28:39+5:30

अधिवेशन सुरू आहे. फार वेळ वाया न घालवता या नव्या पुरस्कारांची आणि अभ्यासक्रमांची घोषणा अधिवेशनात करून टाका. महाराष्ट्र कृतकृत्य होईल...!

Why do you give Maharashtra Bhushan Give Vachal Bhushan, Thok Bhushan | कशाला देता महाराष्ट्र भूषण..? वाचाळभूषण, ठोकभूषण द्या..!

कशाला देता महाराष्ट्र भूषण..? वाचाळभूषण, ठोकभूषण द्या..!

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई -

समस्त नेते हो,
आपले कौतुक करण्यासाठी शब्द सुचत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे ज्या पद्धतीची विधाने करत आहात, त्यामुळे महाराष्ट्राची उच्च, सुसंस्कृत परंपरा आता जागतिक दर्जाची होईल का, अशी भीती वाटू लागली आहे. चिरंजीव नितेश राणे यांच्याकडे अशा सगळ्या नेत्यांचे  नेतृत्व दिले ते बरे झाले. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम नव्हते... केरळ हा मिनी पाकिस्तान आहे... विरोधी सरपंचांना निधी देणार नाही, बसा बोंबलत... सर्वधर्मसमभावाची आता गरज नाही...! अशी त्यांची काही बोलकी उदाहरणे. 

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘पाणी पीत नाही, मग दारू पिता का?’ असे विचारले होते... मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमामालिनीच्या गालांशी केली होती... तानाजी सावंत यांनीही सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची xx सुटली होती, असे विधान केले... गोपीचंद पडळकर यांनी ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,’ असा शोध लावला होता... तर जितेंद्र आव्हाड यांनी ‘राम शिकार करायचा; मग तो शाकाहारी कसा...?’ असा जोरदार प्रश्न उपस्थित केला होता. 

एक ना दोन... अशी किती उदाहरणे द्यायची! हे लिहीत असताना आमची लेखणी लाजून-लाजून चूर झाली. सुपुत्र नितेश राणे यांची विधाने ऐकून तर त्यांच्या पूज्य पिताजींचा ऊर अभिमानाने भरून येत असेल...! खरे तर अशी विधाने कशी करायची, याचे क्लासेस या सगळ्या नेत्यांनी  घेतले पाहिजेत. नेते हो, गावागावांत जेव्हा आपण जाता, तेव्हा वादग्रस्त विधाने कशी करायची, यावर वेगळे मार्गदर्शन करत जा. आपण आता नेते, मंत्री आहात. त्यामुळे जाण्या-येण्याचा खर्चही आपल्याला लागणार नाही, शिवाय महाराष्ट्राला आपले अमूल्य मार्गदर्शन मिळेल. तरुण पिढीला महाराष्ट्र आणखी सुसंस्कृत आणि सभ्य करण्याचे बळ मिळेल...!

‘मराठी भाषेत शांत, भक्ती, उदात्त, शौर्य असे रस आहेत. मात्र, बीभत्स रस नाही. आपल्या सगळ्या नेत्यांच्या बोलण्यातून जेव्हा हा रस ओसंडून वाहू लागला, तेव्हा कुठे आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला...’ असा शोध कविवर्य अशोक नायगावकर यांनी लावला आहे. या शोधानंतर सरकारनेही आता त्यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये तत्काळ बदल करावा. 

महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ हा आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार आजपर्यंत दिला गेला आहे. त्यांत पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, विजय भटकर, बाबा आमटे, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी, अभय बंग आणि राणी बंग, रघुनाथ माशेलकर, रतन टाटा, नानासाहेब धर्माधिकारी, मंगेश पाडगावकर, अनिल काकोडकर, बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, अप्पासाहेब धर्माधिकारी, अशोक सराफ, सुरेश वाडकर अशा लोकांचा समावेश होता; पण भविष्यात अशी नावे मिळणार नाहीत आणि चालणारही नाहीत, याची आम्हाला खात्री झाली आहे.

त्यामुळे आपल्यासारख्या नेत्यांकडून प्रेरणा घेत महाराष्ट्रात ज्या वेगाने वाचाळ वीर तयार होत आहेत ते पाहून, भविष्यात ‘वाचाळ भूषण’ पुरस्कार देण्याची गरज निर्माण होणार आहे. त्यावेळी तयारी करण्यापेक्षा आतापासूनच या पुरस्काराचे स्वरूप आणि निकष निश्चित करावेत असे वाटते. दोन समाजांत तेढ निर्माण करणारे, सर्वधर्मसमभाव किलोने विकत घेणारे, आपल्या मंत्र्यांच्या समोर विरोधी भूमिका घेणाऱ्यांना ठोकून काढणारे, गुंडांची फौज बाळगणारे, या पुरस्कारासाठी सगळ्यांत आधी पात्र ठरवावेत. जे आपल्या वाचेने समोरच्याला घायाळ करतात, त्यांना ‘वाचाळभूषण,’ जे ठोकून समोरच्याचा कार्यक्रम करतात त्यांना ‘ठोकभूषण’... अशी काही नावे या पुरस्कारासाठी सुचवावी वाटतात. पुरस्काराच्या निवड समितीवर धनंजय मुंडे, नितेश राणे, संजय राऊत अशा काही मान्यवरांना घ्यायला हरकत नाही...!

त्यांनी स्वतःलाच पुरस्कार घेतला, तर बरेच होईल. आपला शोध घेण्याचा वेळ वाचेल. या पुरस्कारामुळे महाराष्ट्र आणखी सुसंस्कृत होईल. शालेय अभ्यासक्रमातही आता बदल करण्याची हीच योग्य वेळ आहे. हाणामाऱ्या कशा करायच्या? शेलक्या शब्दांत समोरच्याचा सन्मान कसा करायचा? असे काही विषय अभ्यासक्रमात ठेवायला पाहिजेत. शिवाय गेल्या दोन-तीन वर्षांत आपण सगळ्यांनी मराठी शब्दसंग्रहात भर टाकलेली शब्दसंपदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ असे आपल्या पूर्वजांनीच सांगून ठेवले आहे. त्यामुळे आता ‘पुत्र व्हावे ऐसे गुंडे, त्यांचे तिन्ही लोकी झेंडे...’ असा व्यापक विचार करण्याची वेळ आली आहे. अधिवेशन सुरू आहे. फार वेळ वाया न घालवता या नव्या पुरस्कारांची आणि अभ्यासक्रमांची घोषणा अधिवेशनात करून टाका. महाराष्ट्र कृतकृत्य होईल...!
आपलाच, बाबूराव

Web Title: Why do you give Maharashtra Bhushan Give Vachal Bhushan, Thok Bhushan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.