Nagpur Mayor: नागपुरात भाजप कुणाला महापौर करणार? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सांगितलं नाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:45 IST2026-01-22T17:41:48+5:302026-01-22T17:45:31+5:30
Nagpur Municipal Corporation: नागपूरच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच राजकारण तापले आहे, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Nagpur Mayor: नागपुरात भाजप कुणाला महापौर करणार? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सांगितलं नाव!
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौरपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. गुरुवारी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक दावा केला. भाजपच्या आक्रमक युवा नेत्या शिवानी दाणी या नागपूरच्या पुढील महापौर असतील, असे भाकीत वडेट्टीवार यांनी वर्तवले असून, या दाव्यामुळे नागपूर भाजपमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटल्याची चर्चा आहे. तसेच भाजपमधील इतर इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. नागपूर भाजपचा बालेकिल्ला असल्याने महापौरपदासाठी अनेक वरिष्ठ नगरसेवक शर्यतीत आहेत. अशा वेळी एका तरुण चेहऱ्याला झुकते माप दिल्यास पक्षात काय प्रतिक्रिया उमटतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत सुटल्यानंतर विजय वडेट्टीवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, "भाजपकडून शिवानी दाणी यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित मानले जात आहे." वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपने नेहमीच तरुण नेतृत्वाला संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. अलीकडेच ४५ वर्षीय नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड याच बदलाचा संकेत आहे, याच धर्तीवर नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात तरुण चेहरा देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
नागपूर भाजपचा तरुण आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवानी दाणी यांची अल्पावधीतच पक्षातील एक अभ्यासू नेत्या म्हणून ओळख निर्माण झाली. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने त्यांना मैदानात उतरवले, जिथे त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली. त्या सध्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या सरचीटणीस म्हणून कार्यरत आहेत आणि तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. शिवानी दाणी यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहे. शिवानी दाणी यांच्या नावाची चर्चा होण्यामागे ऐतिहासिक संदर्भही दिला जात आहे. साधारण तीन दशकांपूर्वी भाजपने तरुण देवेंद्र फडणवीस यांना महापालिकेत संधी दिली होती, त्यानंतर ते नागपूरचे महापौर झाले आणि आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत.