रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:08 IST2025-11-03T16:01:29+5:302025-11-03T16:08:44+5:30
उतावीळपणे का होईना सत्ताधारी पक्षानेही मतदार यादीतील घोळ मान्य केला असंही मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलं.

रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
मुंबई - सत्याचा मोर्चा हा पारदर्शक मतदार यादीसाठी होता. जे या मोर्चाविरोधात बोलत होते, तेच त्यांच्याच मुखातून मतदार यादीतील दुबार वाचून दाखवत आहेत. या लोकांनी प्रश्न राज ठाकरेंना विचारले. पारदर्शक मतदार यादीसाठी मोर्चा निघाला असताना त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा केविळवाणा प्रयत्न भाजपाने केला. याचा कुठे दुरान्वये संबंध नाही. राज ठाकरे यांच्या हिंदुत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करता तेव्हा आम्हाला आठवण होते, जेव्हा रझा अकादमीने आझाद मैदानावर धुडगूस घातला होता. तेव्हा लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला होता तेव्हा भाजपावाले कुठे होते असा सवाल मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी विचारला आहे.
भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपांवर मनसेने पलटवार केला. अभ्यंकर म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय, उत्तर भाजपा का देतेय, त्याचे कारण काय? निवडणूक आयोगाने २९ पानी पत्र काढले आहे. त्यात १२ राज्यांचा उल्लेख आहे. त्यात SIR बाबत कुठेही महाराष्ट्राचा उल्लेख नाही. याबाबत आम्ही विचारणा केली तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने SIR घेता येणार नाही असं राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं. मुळात राज्यातील सर्वच पक्षाने मतदार यादीतील घोळ मान्य केला आहे. मूक मोर्चा काढला जातो आणि तिथे भाषणे केली जातात हा २०२५ चा विनोद आहे असा टोला त्यांनी भाजपाच्या मूक मोर्चाला लगावला.
तसेच काही गोष्टी खरोखर कळत नाही. आम्ही मागणी स्पेशल समरी रिवीजनची आहे ती तुम्ही का करत नाही. जय पराजय कुणाचाही होईल. मतदार यादीतील घोळ सुधारा आणि निवडणूक घ्या ही आमची मागणी आहे. मुंबईत १० हजाराहून अधिक मतदार याद्या आहेत. निवडणूक आयोगाने BLO ची यादी पत्त्यासह जाहीर करावी. प्रत्येक पक्षाने बीएलए नेमलेले असतात. आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही असं निवडणूक आयोग सांगतो. निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, इतकी घाई कशाला? उतावीळपणे का होईना सत्ताधारी पक्षानेही मतदार यादीतील घोळ मान्य केला असंही मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलं.
दरम्यान, आमची मागणी मतदार याद्या शुद्ध करा आणि निवडणूक घ्या ही आहे. इतरांना मिरच्या झोंबण्याचं कारण नाही. सत्ताधाऱ्यांसकट सगळ्यांनी दुबार मतदार आहेत हे मान्य केले. आम्ही प्रश्न केले आहेत उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावीत. भाजपा याला जातीधर्माचा रंग देतंय..मतदार यादी शुद्ध करा ही सगळ्यांची मागणी आहे. राज ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी राज ठाकरे दुसऱ्यांचा पक्ष फोडत नाही. जय-पराजय झाला तो त्याच पद्धतीने ते स्वीकारतात. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे यांनी स्वत:वर १०० हून अधिक गुन्हे घेतले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत. जेलमध्ये गेलेले आहेत. मतदार यादी शुद्ध करणे ही मागणी योग्य आहे ती चुकीची ते भाजपाने सांगावे. निवडणूक आयोगाचे हे काम आहे. उदाहरणासाठी काही नावे घेतली, त्यात मतदार यादीतील घोळ सांगितला. त्यात एका जातीची, धर्माची माणसे नाहीत. साडे नऊ कोटी मतदार आहेत त्यातील दुबार, पत्ता बदललेले, मृत झालेले, जे सापडत नाहीत ती नावे वगळण्यात यावीत हे सामान्य चौथी पास झालेल्या माणसालाही कळू शकेल. यात जातीचा पातीचा विषय येत नाही. निवडणूक आयोगाचे वकीलपत्र भाजपाने घेतले आहे. तुम्ही आयोगाचे प्रवक्ते आहात का असा प्रश्न मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी आशिष शेलार यांना विचारला.