'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:30 IST2025-08-21T16:28:23+5:302025-08-21T16:30:43+5:30
Ajit pawar Sunetra Pawar: खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलग्नित राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याबद्दल जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आलं, तेव्हा ते काय बोलले?

'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
खासदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमाला लावलेली हजेरी चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवारांना एका पत्रकार परिषदेत जेव्हा याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी मिश्कील उत्तर देत माध्यमांच्या प्रतिनिधींचे कान टोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे उत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. त्यांच्या या उपस्थितीबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी मिश्कील उत्तर देत माध्यमांच्या प्रतिनिधींचे कान टोचले.
माझ्या बायकोची सगळी माहिती मला नसते -अजित पवार
सुनेत्रा पवारांबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, 'मी विचारतो, मला माहिती नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनिट टू मिनिट मला माहिती नसते. आपण आताच विचारलं आहे. मी आता विचारतो, का ग कुठे गेली होती?"
काय प्रश्न विचारावेत? अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
त्यानंतर अजित पवार हात जोडत म्हणाले, "काय खरंच ना? मला कधी कधी... तो तुमचा अधिकार आहे. पण, काय आपण प्रश्न विचारावेत अजित पवार इथे वर्ध्याला आले आहेत. आपल्या वर्ध्याच्या फायद्याचं काही विचारायचं. ते दिलं सोडून... अजित पवार काय म्हणाले. आता माझं दाखवतील अजित पवार असं बोलले, मग तुमचं काय म्हणणं आहे. मग त्यांचं दाखवतील. हे काय चाललंय', असा उद्विग्न सवाल करत अजित पवारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींचे कान टोचले.
या कार्यक्रमाबद्दल खासदार सुनेत्रा पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, स्नेहमिलनाचा कार्यक्रम म्हणून बोलवण्यात आले होते. आरएसएसचा कार्यक्रम आहे, याची माहिती नव्हती. अभिनेत्री आणि खासदार कंगणा रणौत यांच्या घरी राष्ट्र सेविका समितीच्या बैठक ही झाली.