"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 09:32 IST2025-11-22T08:32:06+5:302025-11-22T09:32:39+5:30
एकनाथ शिंदे यांनी जे पेरलं तेच उगवलं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
Uddhav Thackeray Shivsena Slams Eknath Shinde Amit Shah Meet: राज्यात महायुतीमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीचा दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर, विशेषतः भाजपच्या काही नेत्यांकडून सुरू असलेल्या 'फोडाफोडी'च्या राजकारणावर आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर आणि अमित शाह यांच्या भेटीवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी जे पेरलं तेच उगलवं आहे, भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
महायुतीतील नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याबद्दल दैनिक सामनातून जोरदार टीका केली आहे. हे सर्व नाराजी महानाट्य गांभीर्याने घेण्याची गरज नसून, शिंदेंनी भाजपच्या 'फोडाफोडी'च्या राजकारणाची थेट दिल्लीत तक्रार करणे, ही त्यांच्या असहायतेची खूण आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
तुमचा पक्ष हा भाजपची उपशाखा
"उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील त्यांचे पक्षप्रमुख अमित शहांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली, ‘‘हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही.’’ शिंदे यांच्या तक्रारीवर अमित शहा फसकन हसले. शिंदे यांनी विचारले, ‘‘साहब, आप क्यूं हस रहे हो.’’ यावर शहा म्हणाले, ‘‘कोण कोणाचा पक्ष फोडत आहे? मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे, भाजपने फोडाफोडी करून बनवला. तुम्ही फुटलात. आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही ‘पक्ष’ वगैरे भाषा वापरत आहात. तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपची उपशाखा आहे. शिंदेजी, आप क्रोनॉलॉजी समझ लीजिए. पैसे वाटून माणसे फोडण्यात तुमचा हातखंडा आहे. चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. आप मुंबई जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पिओ. उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका.’’ शहा-शिंदे यांच्यामधला हा संवाद मनोरंजक आहे,ठ असा दावा सामनातून करण्यात आला आहे.
युतीच्या राजकारणात हे शोभत नाही
"आता शिंदे म्हणतात, त्यांची दिल्लीवारी यशस्वी झाली व आपला सन्मान राखण्याचा शब्द शहा यांनी दिला ही शिंदे यांची बतावणी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने शिंदे यांची अनेक माणसे फोडली. युतीच्या राजकारणात हे शोभत नाही. भारतीय जनता पक्षाने हे असे केले तर आमचा पक्ष टिकणार नाही अशी शिंदे व त्यांच्या लोकांची चिंता आहे. रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी’ असे म्हणायला हवे. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटास खिंडार पाडले. शिंदे यांनी जी माणसे पाच-पंचवीस लाखांना विकत घेतली, त्यातील बरीच माणसे चव्हाण यांनी होलसेलात विकत घेतली. म्हणजे शिंदे यांचाच मार्ग चव्हाण यांनी अवलंबला," अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली.
आमच्या नादाला लागाल तर असेच चोपून काढू
गुरुवारी ठाण्यात शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी बेदम चोप दिला. आमच्या नादाला लागाल तर असेच चोपून काढू, असा इशारा चव्हाणांच्या लोकांनी दिल्याने ठाण्यातील मिंधे मंडळास बहुधा अतिदक्षता विभागात दाखल केले असावे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री शिंदे या घडामोडींमुळे नाराज आहेत, पण त्यांच्या नाराजीची दखल कोणी घ्यायला तयार नाही. शिंदे यांच्या दिल्लीवारीसही आता महत्त्व उरलेले नाही. भारतीय जनता पक्षाचा मूळ स्वभाव ‘वापरा, फेका, नाहीतर गिळून फस्त करा,’ असाच आहे. शिंदे व त्यांच्या बरोबरचे ४० आमदार फुटले तेव्हा शिंदे हे मजबूत, महान नेते असल्याचा देखावा भाजपने तयार केला. शिंदे यांच्या हाती धनुष्यबाण व शिवसेना सोपवली. त्यामुळे आपणच शिवसेनाप्रमुख अशा तोऱ्यात शिंदे वावरले. आता भाजपने त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात केल्यावर या सगळय़ांची दाणादाण उडाली आहे," असा टोला लगावण्यात आला.
शिंदेंना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू
"शिंदे यांनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली, त्याच तलवारीने आता त्यांचा घात होत आहे. शिंदे हे ठेकेदार सेना चालवतात. त्यामुळे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत तसे शिंदे यांना लोक चिकटलेले आहेत. भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी शिंदेंसमोर मोठी गुळाची ढेप ठेवली. शिंदे यांचे मुंगळे हे भाजपच्या ढेपेवर चढले. शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले आहे. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला आहे. रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसे फोडली या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरले नाही. जे शिंदे स्वतःच फुटले, त्यांनी माणसे फोडण्यावर चिंता व्यक्त करावी, हा मोठाच विनोद आहे. महाराष्ट्रात सत्तापक्षांतील ‘नाराजी’ नाट्य सुरूच राहील. या नाराजी नाट्याचा तिसरा अंक आता सुरू झाला आणि हा अंक संपवणारी घंटा वाजत आहे. नाराज शिंदे यांना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही. नाराजीचे महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे," असंही सामनात म्हटलं.