MNS Avinash Jadhav News: परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाविरोधात मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्याशिवाय मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेकांना नोटीस बजावल्या होत्या. १० वाजता मोर्चा स्थळी कार्यकर्ते जमू लागले तेव्हा पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू झाली. त्यातूनच मीरारोडमध्ये संघर्ष वाढला. या सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली. मनसे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ११ तासांत नेमके काय-काय घडले, याबाबत अविनाश जाधव यांनी माहिती दिली.
पोलिसांनी कितीही अडवले तरी मोर्चा होणारच असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला परंतु मोर्चातील लोकांच्या संख्येमुळे त्यांना अडवणे अशक्य झाले. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते यांनी हजेरी लावली. मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अभिजित पानसे या मोर्चात सामील झाले होते. तत्पूर्वी, पोलिसांनी अविनाश जाधव यांना नोटीस बजावली होती. पण, ते मोर्चामध्ये जाण्यास ठाम असल्यानंतर पहाटे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अविनाश जाधव यांना मंगळवारी पहाटे ३ वाजता त्यांच्या घरी जाऊन ताब्यात घेतले. त्यानंतर अविनाश जाधव यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
व्यापारी विना परवानगी मोर्चा काढू शकतात, तर आम्ही भूमिपूत्र आहोत
पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. जवळजवळ दीड ते दोन हजार महाराष्ट्र सैनिकांना ताब्यात घेण्यात आले होते. खरेतर याची गरज नव्हती. व्यापारी विना परवानगी मोर्चा काढू शकतात, तर आम्ही भूमिपूत्र आहोत. आम्ही महाराष्ट्रातील आहोत, मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे, मग आम्हाला मोर्चाची परवानगी द्यायला काय अडचण होती. पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की, या मार्गाने नको, त्या मार्गाने मोर्चा काढा. पण पोलीस आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी असे बोलले नाहीत, पोलीस चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप अविनाश जाधव यांनी मीडियाशी बोलताना केला.
आमच्या मोर्चाला सरकारकडूनच विरोध
आमच्या मोर्चाला सरकारकडून विरोध होता. स्थानिक आमदार आणि गृहखात्याने मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. मराठी माणूस एकवटला आणि मोर्चा निघाला. मीरा भाईंदरमध्ये ७ ते ८ तास जे चालले ते महाराष्ट्राने पाहिले, देशाने पाहिले, असे अविनाश जाधव म्हणाले. अविनाश जाधव यांना पोलिसांनी ११ तासांनी सोडल्याचे म्हटले जात आहे.
पोलीस अधिकारी म्हणतात की माझ्यावर दबाव आहे
माझ्या घरी सकाळी पोलीस आल्यानंतर माझा पोलिसांना पहिला प्रश्न होता की, मराठी माणसांचा हा मोर्चा आहे, अधिवेशन चालू असताना तुम्ही मला घेऊन जात आहात, या मोर्चाला विरोध करत आहात मग हे सरकारच्या विरोधात जाईल, असे तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा पोलीस अधिकारी म्हणतात की माझ्यावर दबाव आहे, असा दावा अविनाश जाधव यांनी केला.
दरम्यान, मीरा रोड येथील मोर्चाला मंत्री प्रताप सरनाईक गेले होते. या मोर्चात प्रताप सरनाईक पोहोचले, तेव्हा मोठ्या संख्येने त्यांना विरोधाला सामना करावा लागला. त्यांनी निघून जावे, अशी घोषणाबाजी संतप्त कार्यकर्त्यांनी केली. परंतु काही लोक या मोर्चात राजकारण करत आहेत, असा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. ठाकरे गट आणि मनसेचे हे राजकारण सुरूच राहणार आहे. मी मीरा-भाईंदरमधील लोकांसोबत राहणार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. मी मंत्री, आमदार नंतर आहे, आधी मराठी आहे, अशी स्पष्ट भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली.