Sangli News: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणीटंचाई; पाणवठे पडले कोरडे, तहानेने वन्यप्राणी गावाच्या वेशीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 13:19 IST2026-03-07T13:18:29+5:302026-03-07T13:19:15+5:30

कडक उन्हाळा आणि पाण्याचा अभाव यामुळे वन्यजीवांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो

Water shortage crisis in Sahyadri Tiger Reserve area as summer heat increases Wild animals thirsty at village | Sangli News: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणीटंचाई; पाणवठे पडले कोरडे, तहानेने वन्यप्राणी गावाच्या वेशीवर

संग्रहित छाया

आनंदा सुतार

वारणावती : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. जंगलातील नैसर्गिक, तसेच कृत्रिम पाणवठे तळ गाठू लागल्याने वन्यप्राण्यांपुढे तहानेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परिणामी पाण्याच्या शोधात काही वन्यप्राणी आपला अधिवास सोडून मानवी वस्तीकडे वळू लागल्याने प्रकल्प परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्याघ्र प्रकल्पात पर्यटन आणि पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. मात्र, सध्या आर्थिक वर्ष संपत आल्याने अनेक ठिकाणी नवीन कामे पूर्ण करणे आणि त्यांची बिले निकाली काढणे यावर प्रशासनाचा भर असल्याचे चित्र आहे. याच गडबडीत वन्यप्राण्यांच्या पाण्याकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे. गाभा क्षेत्रातील अनेक नैसर्गिक पाणवठे आटले असून, या काळात कृत्रिम पाणवठेच वन्यप्राण्यांचा मुख्य आधार ठरतात. 

मात्र, अनेक ठिकाणी हे पाणवठे कोरडे पडल्याने बिबट्या, गवा, भेकर, सांबर यांसारखे प्राणी पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. त्यामुळे काही गंभीर परिणामांची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्याच्या शोधात प्राणी गावांकडे येऊ लागल्याने पाळीव जनावरांवर हल्ल्यांचा धोका वाढू शकतो. जंगलाबाहेर पडणाऱ्या प्राण्यांवर शिकारी टपून बसण्याची शक्यता वाढत आहे कडक उन्हाळा आणि पाण्याचा अभाव यामुळे वन्यजीवांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. 

वन विभागाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करून पाणवठे भरले नाहीत, तर वन्यप्राण्यांचे जंगलाबाहेर स्थलांतर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना, सह्याद्रीतील या पाणीटंचाईकडे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने लक्ष देतात का, याकडे आता स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

“नवीन सिमेंटच्या कामांपेक्षा सध्या कोरडे पडलेले पाणवठे भरणे अधिक महत्त्वाचे आहे. तहानलेले प्राणी गावांकडे येणारच. योग्य नियोजन न झाल्यास भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढू शकतो.” - मनिषा पाटील, शिराळा पंचायत समितीच्या सदस्या

सह्याद्री प्रकल्पातील सर्व कृत्रिम पाणवठे लवकरच भरले जाणार असून, त्यासाठी आवश्यक असलेले नियोजन सध्या सुरू आहे. - ऋषिकेश पाटील, वनक्षेत्रपाल, चांदोली

Web Title : सह्याद्री व्याघ्र अभयारण्य में जल संकट; जानवर गांवों में पानी ढूंढ रहे हैं।

Web Summary : सह्याद्री व्याघ्र अभयारण्य में पानी की कमी बढ़ी। पानी के स्रोत कम होने से वन्यजीव गांवों के पास पानी ढूंढने को मजबूर हैं, जिससे मानव-पशु संघर्ष की चिंता बढ़ रही है। प्रवास और संभावित खतरों को रोकने के लिए तत्काल पानी की आपूर्ति महत्वपूर्ण है।

Web Title : Sahyadri Tiger Reserve Faces Water Crisis; Animals Seek Water in Villages.

Web Summary : Water scarcity intensifies in Sahyadri Tiger Reserve. Depleted water sources force wildlife to seek water near villages, raising concerns about human-animal conflict. Immediate water supply is crucial to prevent migration and potential dangers.