उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 21:22 IST2025-10-13T21:20:50+5:302025-10-13T21:22:11+5:30
Ulhasnagar Water Crisis: उल्हासनगर येथील श्रीरामनगरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ नागरिकांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मोर्चा काढला.

उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न
उल्हासनगर: कॅम्प नं-४ येथील श्रीरामनगरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ नागरिकांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मोर्चा काढला. यावेळी संतप्त झालेल्या भाजपा पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
उल्हासनगरातील अनेक भागात दिवाळी सणापूर्वी पाणी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र शहरांत आहे. तर दुसरीकडे गळक्या जलवाहिनीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. कॅम्प नं-४ परिसरातील श्रीरामनगर, संतोषनगर, महादेवनगर, ओटी सेकशन आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, महिलावर पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली.
श्रीरामनगरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी नेताजी चौक येथील महापालिका पाणी पुरावठा कार्यालयावर धडक दिली होती. मात्र त्यानंतरही पाणी टंचाई कायम असल्याने, संतप्त शेकडो नागरिकांनी भाजपचे नेते नरेंद्र राजांनी, माजी नगरसेवक दिलीप जग्याशी, योगेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मोर्चा काढला. पाणी द्या पाणी द्या अश्या घोषणा संतप्त नागरिकांनी दिल्या.
भाजपचे पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी श्रीरामनगर परिसरात वारंवार पाणी टंचाई का निर्माण होते. याचा जाब विचारून पाणी नियमित देण्याची मागणी केली. तसेच हातातील ज्वलंशील पदार्थ अंगावर टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भाजपा नेते नरेंद्र राजांनी यांनी मध्यस्थी करून म्हात्रे यांना शांत केले. महापालिका पाणी पुरवठा विभागाचा कारभार ठप्प पडला असून विभागातील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.