आदर्श आचारसंहितेचा भंग, चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 08:12 IST2026-01-28T08:09:13+5:302026-01-28T08:12:00+5:30

Congress Harshwardhan Sapkal News: राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवले असून, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

violation of model code of conduct file a case against bjp minister chandrakant patil congress harshwardhan patil writes letter to election commission | आदर्श आचारसंहितेचा भंग, चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

आदर्श आचारसंहितेचा भंग, चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

Congress Harshwardhan Sapkal News: राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे, असे असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री जाणीवपूर्वक आणि उघडपणे या आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वसंध्येला सांगली जिल्ह्यात झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, “जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणार नाही, वेळ आणि पैसा कशाला वाया घालवता, अर्ज मागे घ्या” असे विधान केले आहे. हे विधान विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर थेट दबाव टाकणारे असून निवडणूक प्रक्रियेला बाधा आणणारे आहे, याची तातडीने आणि गांभीर्याने दखल घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा तसेच निवडणूक प्रक्रिया प्रभावित होऊ नये यासाठी त्यांना निवडणूक प्रचार सभा घेण्यास प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

राज्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणतात की, लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडल्या जाव्यात, ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे. त्यासाठीच निवडणूक आयोग आदर्श आचारसंहिता लागू करतो. मात्र राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री जाहीर सभेतून विरोधी पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन करत असतील, तर तो केवळ आचारसंहिता भंग नसून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप  करून प्रक्रिया प्रभावित करण्याचा गंभीर प्रकार आहे.

चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री असून त्यांच्या हातात प्रशासकीय व राजकीय सत्ता आहे. अशा पदावर असलेल्या व्यक्तीकडून केलेले असे विधान विरोधी पक्षांच्या उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करते. उमेदवारांवर दहशत निर्माण करून त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडणे किंवा प्रचारापासून परावृत्त करणे, हा लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर घाला आहे. यापूर्वी नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांच्या काळातही सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून अशाच प्रकारे दबावतंत्राचा वापर झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. आता त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये होताना दिसत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. लोकशाही, संविधान आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेचे रक्षण करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्याची पूर्तता या प्रकरणात कठोर कारवाईद्वारे व्हावी असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

 

Web Title : आदर्श आचार संहिता उल्लंघन: चंद्रकांत पाटिल पर कार्रवाई की कांग्रेस की मांग।

Web Summary : कांग्रेस ने चंद्रकांत पाटिल पर चुनाव आचार संहिता का उल्लंघन करने का आरोप लगाया है। सांगली में विरोधियों पर दबाव डालने के लिए कांग्रेस ने चुनाव आयोग से मामला दर्ज करने और निष्पक्ष चुनाव सुनिश्चित करने के लिए पाटिल को प्रचार करने से रोकने का आग्रह किया है।

Web Title : Congress demands action against Chandrakant Patil for code of conduct breach.

Web Summary : Congress seeks action against Minister Chandrakant Patil for allegedly violating election code of conduct by pressuring opponents in Sangli. They've urged the Election Commission to file a case and restrict Patil from campaigning to ensure fair elections.