३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:42 IST2025-07-02T15:41:27+5:302025-07-02T15:42:36+5:30
आमदार उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांच्याबाबत हे झाले होते. स्वत: राम शिंदे सभापती होण्यापूर्वी त्यांच्यासोबतही हे घडले होते. अशा टोळ्या राज्यात कार्यरत आहेत असं आमदार लाड यांनी म्हटलं.

३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
मुंबई - भाजपाचेविधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत धक्कादायक माहिती दिली आहे. लाड यांचं बनावट लेटरहेड वापरून काहींनी ३.२० कोटी सरकारी निधी लंपास केल्याचा आरोप आहे. अधिवेशन संपल्यानंतर ४.३० वाजता मला रत्नागिरी येथून अधिकाऱ्यांचा फोन आला. आपण मागणी केल्याप्रमाणे ३ कोटी २० लाख निधी बीड जिल्ह्याला वर्ग केला आहे. त्याबाबत तुमचा फोनही आला होता असं सांगण्यात आले. त्यानंतर मला संशय आला आणि ती पत्राची प्रत मागवली. त्यातले लेटरहेड बनावट होते. सही खोटी होती. मी फोनही केला नव्हता असा गंभीर आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला.
प्रसाद लाड म्हणाले की, मी चौकशी केली असता हा निधी कुणीतरी चोरायचा प्रयत्न केला आहे हे लक्षात आले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही बाब घातली. मुंबई पोलीस आयुक्तांशी बोललो. रात्री उशिरा याबाबत सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ४ नावे माझ्याकडे आली तीदेखील पोलिसांना कळवली आहेत. याप्रकारे सरकारी निधी हडपण्याचा प्रकार समोर आला. हा निधी मोठा होता म्हणून लक्षात आले. परंतु छोटे छोटे निधी हडप करण्याचे प्रकार याआधीही झालेत असं त्यांनी सांगितले.
तसेच आमदार उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांच्याबाबत हे झाले होते. स्वत: राम शिंदे सभापती होण्यापूर्वी त्यांच्यासोबतही हे घडले होते. अशा टोळ्या राज्यात कार्यरत आहेत. बीड जिल्ह्याचे नाव आल्यावर मी सतर्क झालो. आधीच बीडचा बोलबाला झाला आहे. बीडमधले हे महाठग कोण आहेत त्याची पोलीस चौकशी करत आहेत. माझ्याकडे अज्ञात नंबर आलेत ते पोलिसांना दिलेत. बंडू नावाचा गृहस्थ आहे जे सरपंच असल्याचे सांगतात. पोलीस चौकशी करतील. तांत्रिक पद्धतीने आमदार निधी वाटप केले जावे, जेणेकरून आमदारांना त्याचा ओटीपी येईल मग निधी दिला जाईल अशी मागणी मी सभागृहात केल्याचे आमदार प्रसाद लाड म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत सभापतींनी चौकशी करून तात्काळ दोषींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.