Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:17 IST2025-10-04T13:12:24+5:302025-10-04T13:17:28+5:30
रामदास कदम यांचे शिक्षण कमी आहे. मोल्ड आणि ठसे त्यांना माहिती नाहीत. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांचे ठसे घेतले गेले असा त्यांचा आरोप आहे. असे कुठले ठसे घेतले, त्याचा उपयोग काय झाला असा पलटवार अनिल परब यांनी केला.

Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
मुंबई - रामदास कदम यांनी जे आरोप केले ते १०० टक्के खोटे आहेत. बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. कुठलाही मृतदेह २ दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? रामदास कदमांची अक्कल गुडघ्यात आहे. शवागृह किंवा शवपेटीशिवाय मृतदेह २ दिवस ठेवता येऊ शकतो का? मातोश्रीवर तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक होते, ते २ दिवस मृतदेह ठेवू शकतात का? त्यामुळे कदम यांनी केलेले आरोप खोटे आहेत असं सांगत अनिल परब यांनी रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला.
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत एक फोटो दाखवत सांगितले की, बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी स्वत:च्या हाताचे मोल्ड बनवले होते. बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत हे मोल्ड बनवले होते. हे मोल्ड अंधेरीतील सहारा स्टेडियममध्ये जेव्हा तिथे सर्व खेळाडूंचे मोल्ड ठेवले होते. तिथे बाळासाहेबांच्या हयातीत त्यांच्या हाताचे मोल्ड बनवण्यात आले. त्यानंतर हे मोल्ड उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या वर्षा निवासस्थानी जिथे उद्धव ठाकरे बसायचे त्या केबिनमध्ये होते. हे मोल्ड बाळासाहेबांनी बनवलेले आहेत. याला ठसे म्हणत नाहीत असं त्यांनी सांगितले.
तसेच रामदास कदम यांचे शिक्षण कमी आहे. मोल्ड आणि ठसे त्यांना माहिती नाहीत. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांचे ठसे घेतले गेले असा त्यांचा आरोप आहे. असे कुठले ठसे घेतले, त्याचा उपयोग काय झाला, अशा ठसांचा काय उपयोग होतो? ते सांगावे. स्वीस बँकेची पद्धत रामदास कदमांना माहिती आहे का, त्यांचे तिथे अकाऊंट आहे का? असे ठसे घेऊन स्वीस बँकेतून पैसे येतात का, बाळासाहेबांचे मृत्यूपत्र माझ्याकडे होते, त्यामुळे त्यांची संपत्ती काय होती हे माझ्यापेक्षा कुणाला ठाऊक नाही असा टोलाही अनिल परब यांनी रामदास कदमांना लगावला.
दरम्यान, शरद पवार आज हयात आहेत, त्यांनी आरोपांवर उत्तर द्यावे. मी कदमांच्या आरोपावर कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा करणार आहोत. केवळ हवेत बार सोडायचे. बाळासाहेबांच्या मृत्यूचं हे राजकारण करतायेत. पक्ष चोरले, माणसे चोरले आता बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करून उद्धव ठाकरे कसे वाईट आहेत हे चित्र समोर आणण्यासाठी हे सुरू आहे. शेवटच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आलेले लोक तिथे वरती जात होते. उद्धव ठाकरेंनाही भेटत होते. बाळासाहेबांचा मृत्यू जाहीर केला त्यावेळी रुग्णवाहिकेतून बाळासाहेबांचे पार्थिव शिवाजी पार्कला नेऊन तिथे दर्शनासाठी ठेवायचे हे ठरले होते. परंतु इतक्या लोकांची गर्दी होती त्यामुळे मातोश्रीहून अंत्ययात्रा सुरू करून शिवाजी पार्कला न्यावे असं पुन्हा ठरले असंही अनिल परब यांनी सांगितले.