रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:21 IST2025-10-09T17:20:28+5:302025-10-09T17:21:08+5:30
गुंड निलेश घायवळचे रोहित पवार यांच्या मातोश्रीकडून कौतुक होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
Nilesh Ghaywal: कोथरूड गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या आरोपी निलेश घायवळ याचे नाव राज्यातील अनेक नेत्यांसोबत जोडले जात असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असू शकतात असा धक्कादायक आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. गुंड निलेश घायवळ हा सभापती राम शिंदे सर यांच्या जवळचा आहे, असंही रोहित पवार म्हणाले. त्यानंतर निलेश घायवळ याचा राम शिंदेंसोबतचा व्हिडीओ समोर आला होता. रोहित पवारांच्या आरोपांनंतर आता भाजपनेही व्हिडीओतूनच प्रत्युत्तर दिलं आहे.
गुंड निलेश घायवळचा सभापती राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ व्हायरल व्हायरल झाल्यानतंर भाजपने रोहित पवार यांचे सचिन घायवळसोबतचे फोटो समोर आणले आहेत. तसेच रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचाही निलेश घायवळसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. शस्त्र परवान्यामुळे चर्चेत आलेल्या सचिन घायवळसोबत रोहित पवार बोलत असल्याचे फोटो भाजपकडून पोस्ट करण्यात आले. शस्त्र परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करत होते का असा सवाल भाजपकडून विचारण्यात आला.
दुसरीकडे, रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचा गुंड निलेश घायवळसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. निलेश घायवळने केलेल्या मदतीचे सुनंदा पवार यांनी जाहीर कौतुक केले होते. आता व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोव्हिड काळात निलेश घायवळने शाळेला मदत केल्याने सुनंदा पवार यांनी त्यांचे आभार मानले होते. निलेश भाऊंचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही खूप गरजेची गोष्ट या शाळेला दिली. याच्यासाठी तुमचे मनापासून आभार, असं सुनंदा पवार व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.
आमदार रोहितजी पवार यांचे सचिन घायवळ यांच्यासोबतचे काही फोटो!
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) October 9, 2025
परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहितजी करत होते का?
यह रिश्ता क्या कहलाता है? https://t.co/tU5gNs6BM4pic.twitter.com/y2Wew18Bn6
दरम्यान, पुण्यातील कोथरुड परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात गुंड निलेश घायवळ विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो लंडनला पळून गेला आहे. गुन्हा दाखल असतानाही घायवळला पासपोर्ट मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यातच त्याचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर शस्त्र परवाना मिळाल्याचे समोर आल्याने वातावरण तापले आहे. दोन्ही घायवळ बंधुंचे राज्यातील अनेक नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झालेत.