Victory of Mahavikas Aghadi candidates is a slap in the face to the talkative: Bjp target by Ajit Pawar | महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय वाचाळवीरांना चपराक : अजित पवारांचा भाजपवर निशाणा 

महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय वाचाळवीरांना चपराक : अजित पवारांचा भाजपवर निशाणा 

पुणे : राज्यातील विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे निकाल जाहीर होत आहे. या निकालांमध्ये महाविकास आघाडीने पुणे, नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला आहे. पुण्यात भाजपचे वर्चस्व मोडीत काढत महाविकास आघाडीचे अरुण लाड मोठ्या मताधिक्याने निवडून आले तर नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी विजय खेचून आणला आहे.  औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांनी विजयी हॅट्ट्रिक साधली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १०५ जागा मिळवून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाची पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मात्र मोठी पीछेहाट झाली आहे. पुणे विभागात तर २० वर्षांनंतर भाजपाच्या गडाला खिंडार पाडण्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. याच धर्तीवर अजित पवारांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.

पवार म्हणाले,  पुणे व नागपूर या पदवीधर मतदारसंघात अनेक वर्षांपासून एका पक्षाचे मोठे वर्चस्व होते. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी सुशिक्षित वर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान करत विश्वास दाखवला आहे. मात्र या गेल्या काही दिवसांत अनेक जण वाचाळ बडबड करत होते.मला त्यांची नावे घेत वेळ वाया घालवण्याची अजिबात इच्छा नाही. पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीतील निकाल हा त्या वाचाळवीरांना मोठी चपराक आहे. 

पवार पुढे म्हणाले, महाविकास आघाडीने अमरावतीच्या जागेवर विजय मिळविला असता तर आणखी समाधान झाले असते. पण त्याठिकाणो जे काही घडले त्याचे दुःख आहे, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. 

आमचा राजकीय प्रयोग यशस्वी झाल्याचे समाधान.. 

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रित मोट बांधत पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी वेगळा राजकीय प्रयोग केला आणि त्यात यश प्राप्त झाल्याचे समाधान आहे. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंनी यांचा हा प्रयोग होता. खऱ्या अर्थाने त्यांचेच हे यश आहे. मात्र आघाडीच्या उमेदवारांचा विजय म्हणजे आमच्या सर्व पक्षांच्या ऐक्याचा विजय आहे. त्याचप्रमाणे जनतेने आमच्या महाविकास आघाडी सरकारवर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. तसेच सर्व मतदारांचे मतदारांना देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असे देखील पवार यांनी यावेळी सांगितले.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Victory of Mahavikas Aghadi candidates is a slap in the face to the talkative: Bjp target by Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.