“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:38 IST2025-10-01T17:35:45+5:302025-10-01T17:38:07+5:30
Prakash Ambedkar News: मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला का वेळ लावत आहेत? शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar News: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता, राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर जनावरांचेही मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची दिवाळी घरात येणारे पीक वाहून गेल्याने त्यांचे स्वप्नही उद्ध्वस्त झाले असल्याचे बहुजन आघाडीने नमूद केले आहे. यातच पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे.
मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला का वेळ लावत आहेत? सरकारचे सर्वेक्षण आणि इतर कोणत्याच गोष्टी झालेल्या नसतांना शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच ठाकरे बंधू एकत्र आले तसेच आंबेडकर बंधू एकत्र येण्याच्या आनंद आंबेडकरांच्या वक्तव्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आंबेडकर बंधू एकत्र येण्यास कोणतीही अडचण नाही. या प्रक्रियेतील काही गोष्टी कौटुंबिक पातळीवर झालेल्या चर्चेतील आहेत.
मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही
काँग्रेस नेते राहुल गांधी मतचोरीच्या मुद्याचा बॉम्ब फोडल्यावर, मतचोरीच्याच नव्हे तर सर्वच मुद्द्यावर राहुल गांधींसोबत एकत्र यायला हरकत नाही. मतचोरीच नव्हे तर मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी एकत्र येण्यात काहीच अडचण नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे उद्योजकांचे कर्ज माफ करताना किंवा त्यांना मदत देताना सरकार कोणतेही सर्व्हे किंवा पंचनामे करत नाही, मग शेतकऱ्यांच्या बाबतीतच हे सोपस्कार का लावले जातात, असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने सरकारला विचारला आहे.
दरम्यान, शेतकरी हवालदिल आहे, पीक नष्ट झाले आहे. महायुती सरकारने शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे, त्यांना तात्काळ मदत देणे गरजेचे आहे पण सर्वे व पंचनाम्याच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करत आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, तर जमीन खरडून गेली आहे त्यापोटी हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत. महायुतीने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ असून दिवाळी पूर्वी कर्जमाफी करावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.