कोकण सड्यांवरील ‘लेपिड्याग्याथिस क्लाव्हाटा'च्या जीवनचक्राचा उलगडा, ऋतुजा कोलते यांचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:11 IST2026-01-01T16:09:58+5:302026-01-01T16:11:11+5:30
सात वर्षांनंतर वनस्पती पुन्हा फुलली, जैवविविधतेच्या संवर्धनाची नवी दिशा

कोकण सड्यांवरील ‘लेपिड्याग्याथिस क्लाव्हाटा'च्या जीवनचक्राचा उलगडा, ऋतुजा कोलते यांचा शोध
महादेव भिसे
आंबोली (सिंधुदुर्ग) : कोकण आणि घाटमाथ्यावरील सड्यांवरील वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेने अनेक संशोधक आणि निसर्ग अभ्यासकांचे लक्ष वेधले आहे. या विशेष अधिवासात, नुकतेच धोक्यात आलेल्या 'लेपिड्याग्याथिस क्लाव्हाटा' वनस्पतीच्या जीवनचक्राचा शोध लावण्यात आला आहे. 'कोच' नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती १८५१ साली एन.ए. डॅल्झेल यांनी प्रथम शोधली; परंतु तिची पुनःशोधसिद्धी जवळजवळ १६६ वर्षांनंतर, २०१७ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकूळ येथील सड्यांवर डॉ. ऋतुजा कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
त्यानंतर डॉ. ऋतुजा कोलते- प्रभू खानोलकर (रा. बेळगाव, द ग्रीन कॉन्सेप्ट, पुणेसोबत संलग्न) आणि त्यांचे सहकारी राहुल प्रभू खानोलकर (जीएसएस कॉलेज, बेळगाव), प्रभा पिल्ले (केरळ), डॉ. शरद कांबळे (म.वि.प्र. समाज संस्थेचे कॉलेज, त्र्यंबकेश्वर), डॉ. ज्ञानशेखर (एम.सी.सी. कॉलेज, चेन्नई), डॉ. जनार्थनमं (गोवा) यांच्या आठ- नऊ वर्षे सुरू असलेल्या सखोल अभ्यासानंतर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
सात वर्षांनंतर वनस्पती पुन्हा फुलली
'लेपिड्याग्याथिस क्लाव्हाटा' वनस्पती मोनोकार्पिक प्लेटेशियल प्रवृत्तीची आहे. या प्रवृत्तीच्या वनस्पती एकाच काळात फुलतात आणि त्यानंतर सर्व झाडे मरतात. त्यानंतर नव्या बियांपासून नवीन वनस्पतींचा जन्म होतो. डॉ. कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दीर्घ अभ्यासानुसार, चौकूळ येथील कोचची सर्व झाडे नोव्हेंबर २०१६ मध्ये फुलली होती आणि २०१७ च्या पावसामध्ये त्या सर्वांनी जीवन संपवले; परंतु सात वर्षांच्या अंतरानंतर, २०२४ मध्ये ती वनस्पती पुन्हा फुलली.
संशोधन जैवविविधतेच्या संवर्धनातील नवीन दिशा
या शोधामुळे कोकण आणि घाटमाथ्यावरील सड्यांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित झाले आहे. डॉ. कोलते आणि त्यांचे सहकारी गेल्या काही वर्षांपासून या वनस्पतीचे संवर्धन आणि जनजागृतीच्या कार्यात लागले आहेत. त्यांचे संशोधन जैवविविधतेच्या संवर्धनातील नवीन दिशा दाखवणारे आहे.
कोलते आणि सहकाऱ्यांचे प्रदेशनिष्ठ वनस्पतींवर संशोधन
लेपिड्याग्याथिस कुळातील बहुतांश प्रजाती प्रदेशनिष्ठ असून, त्यांच्यामध्येसुद्धा असे निरीक्षण आढळण्याची दाट शक्यता आहे. या नव्या संशोधनामुळे कोंकण आणि घाटमाथ्यावरील सड्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून डॉ. ऋतुजा कोलते आणि त्यांचे सहकारी सड्यांवरील प्रदेशनिष्ठ वनस्पती, त्यांची अनुकूलने, पर्यावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम, जनजागृती, त्यांचे लोकसहभागातून संवर्धन, इत्यादी विषयांवर काम करीत आहेत.