बापरे! जुगार अड्ड्याचे आमदाराच्या हस्ते उद्घाटन तर पोलीस महानिरीक्षकांना विशेष आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 15:41 IST2019-11-24T15:29:27+5:302019-11-24T15:41:15+5:30
मंगरुळपीर शहर व तालुक्यात खुलेआम वरळी,मटका, जुगार व्यवसाय मोठ्या प्रमाणात पोफावला असून हा व्यवसाय गाव-गावात पसरला आहे.

बापरे! जुगार अड्ड्याचे आमदाराच्या हस्ते उद्घाटन तर पोलीस महानिरीक्षकांना विशेष आमंत्रण
- मोसीन शेख
मुंबई : मतदारसंघात आमदारांच्या हस्ते विविध विकासकामांचे किवा कार्यकर्त्यांच्या एखांद्या व्यवसायिक दुकानाचे उद्घाटन होताना आपण नेहमीच पहिले आहे. मात्र वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात चक्क स्थानिक आमदारांच्या हस्ते जुगार अड्ड्याचे उद्घाटन ठेवण्यात आले असून, विशेष पोलीस महानिरीक्षकांना ही आमंत्रण देण्यात आले आहे. मंगरुळपीर येथील भाजपचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी गांधीगिरी करत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी स्थानिक आमदार लखन मलिक यांच्या हस्ते आंदोलनाचा भाग म्हणून जुगार अड्ड्याचे उदघाटन करण्याचे ठरविले आहे.
मंगरुळपीर शहर व तालुक्यात खुलेआम वरळी,मटका, जुगार व्यवसाय मोठ्या प्रमाणात पोफावला असून हा व्यवसाय गाव-गावात पसरला आहे. हजारो नागरिक आणि शाळकरी मुळे याच्या नादाला लागलेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमणात आर्थिक नुकसान होत असून फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप गावंडे यांनी केला आहे.
त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचे ठरवले आहे. 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी मंगरुळपीर येथे निशुल्क मटका व जुगार खेळण्याचे भव्य व कायम केंद्र स्थापन करणार असल्याचे निवदेन त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे. तर या जुगार अड्ड्याचे उद्घाटन आमदार लखनजी मलीक यांच्या हस्ते केले जाणार असून पोलीस महानिरीक्षकांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहावे अशी वनंती सुद्धा या निवेदनात करण्यात आली आहे.
मंगरुळपीर तालुक्यात होणाऱ्या या आंदोलनाची मोठ्याप्रमाणावर चर्चा सुरु आहे. तसेच गावंडे यांचे निवेदन सोशल मिडियावर व्हायरल झाले असून चर्चेचा विषय ठरत आहे. तर पोलीस दलात सुद्धा खळबळ उडाली आहे. तसेच आपल्या आंदोलनावर आपण ठाम असल्याचे गावंडे म्हणाले आहे.
ओला दुष्काळ असल्याने आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र जुगाराच्या व्यसनी गेलेले तरुण आलेल्या पिकांचे पैसे सुद्धा जुगारात उडवत असल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने मंगरुळपीर तालुक्यातील अवैध-धंधे बंद करावे, अन्यथा 26 तारखेला मी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करणारच. अनिल गावंडे ( नगरपरिषद सदस्य, मंगरुळपीर )