"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:10 IST2025-10-11T18:09:28+5:302025-10-11T18:10:38+5:30
शिवसेनेने (युबीटी) छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला होता. या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केले. ठाकरेंच्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलारांनी उत्तर दिले.

"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
Uddhav Thackeray Ashish Shelar: अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पिके, जमीन वाहून गेली असून, विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांनी दिल्या जाणाऱ्या मदतीवरून सरकारवर निशाणा साधला. ठाकरेंनी केलेल्या टीकेला कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलारांनी उत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना म्हटले की, "हंबरडा फोडण्यापेक्षा स्वत:वर आसूड उगवला असता तर बरे झाले असते उद्धवजी. कोकणात 3 चक्रीवादळ आली, मदत आम्ही दिली. कर्जमाफी अर्धवट केली, ती आम्ही पूर्ण केली. बांधावर 50,000 ची घोषणा केली, 1-2 रुपयांचे चेक दिले."
"सत्तेत असताना ज्यांनी गावांत शेतकरी मारला आणि कोरोनात सामान्य मुंबईकर. स्वत:ची पापं आठवा, स्वत:वर आसूड उगवण्यापलिकडे तुमच्याकडे काहीही उरणार नाही. हंबरडा राखून ठेवा, तो मुंबई, छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या मदतीला असेल", अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवर टीकेचे बाण डागले.
उद्धव ठाकरेंनी मोर्चात काय मागणी केली?
उद्धव ठाकरे मोर्चात बोलताना म्हणाले, "मी एका अटीवर सरकारच्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे. मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) जे बोलले की, खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर मनरेगातून साडेतीन लाख रुपये देणार. मग मुख्यमंत्र्यांना तुमच्यावतीने आव्हान देतोय की, दिवाळीपूर्वी त्या साडेतीन लाखातील एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात टाकाच. बाकीचं आपण नंतर बघू", अशी मागणी उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारकडे केली आहे.
ठाकरे संतापले; म्हणाले, शेतकऱ्याने न्याय मागितला तर राजकारण?
ठाकरे हंबरडा मोर्चात म्हणाले, "मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होतात. आता मी तुमची नियत काढतो. पण, मी राजकारण करत नाही. एका शेतकऱ्याने मदतीसाठी विचारलं तर त्याला हे सांगतात की, बाबा राजकारण करू नको; मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांची मते पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मतांवर तुम्ही सरकार आणता. शेतकऱ्यांच्या मतांवर तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं? हे कुठले सरकार आहे?", असा उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला केला.