Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 09:16 IST2025-11-21T09:14:36+5:302025-11-21T09:16:43+5:30
Uddhav Thackeray Slams Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
मुंबई : सत्ताधारी महायुतीत फोडाफोडीच्या राजकारणामुळे निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवरून 'बाबा मला मारले म्हणून कोणीतरी दिल्लीला गेले होते', असा टोला उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंचे नाव न घेता लगावला. जे दिवटे निघाले आहेत त्यांना मशालीचे महत्त्व समजणार नाही. त्यांच्यातच आपापल्या नसा आवळणे सुरू झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने आ. ज. मो. अभ्यंकर यांच्या आमदार निधीतून मुंबईतील शाळांना डिजिटल (बोर्ड) पॅनलचे वितरण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नेते विनायक राऊत, आ. अनिल परब, आ. मिलिंद नार्वेकर, आ. वरुण सरदेसाई उपस्थित होते. विरोधी पक्षाच्या आमदार, खासदाराला निधी देण्यासाठी त्यांच्या मुठी आवळतात. सध्या मुलांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसून लोकांना फक्त पक्ष फोडायचे आहेत. खुर्चीवर बसलो की बाकी सगळे गेले खड्ड्यात असे आताचे धोरण आहे. रेवडी दिल्यावर नको ती माणसे निवडून देतो. खड्यामधून तांदूळ की तांदुळातून खडे यातून काय निवडायचे हे शिक्षकांनी शिकवले पाहिजे. चांगला शिक्षक मिळाला असता तर त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली नसती, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
पालिकेत सगळी लुटालूट
शिक्षक लोकप्रतिनिधी आपल्या कामात वेगळा ठसा उमटवत आहे. त्यांनी आमदारकीचा निधी शिक्षणासाठी वापरण्याचे आवाहन करून ते म्हणाले, "पालिकेत सत्ता असताना मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी होण्यासाठी टॅबमध्ये अभ्यासक्रम ठेवला होता. सध्याच्या युगात तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीचा फायदा करून घेता आला पाहिजे. पण, गेली तीन, चार वर्षे महापालिकेचा कारभार कोण पाहत आहे, तेच समजत नाही. सगळी लुटालूट चालली आहे."
'मैत्रीची उब बघितली आता मशालीची धग बघा'
"हिंदुत्वासाठी भाजपचे बरेच चोचले पुरविले होते. आपल्या खांद्यावर बसून ज्यांना महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात नेले तेच आता लाथा मारू लागले आहेत. पण, तो काळ पुन्हा दिसेल. आताचा भाजप हा अमिबा सारखा विचित्र झाला आहे. त्यांच्यात मी आणि अहंपणा अंगात भिनलेला आहे. आतापर्यंत मैत्रीची उब बघितली आता मशालीची धग बघा", असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिवाजी मंदिर येथे ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात भाजपला दिला.
पालघरमध्ये साधू हत्याकांबाबत म्हणाले?
पालघरमध्ये साधू हत्याकांडमधील प्रमुख आरोपी काशीनाथ चौधरी याच्या भाजप प्रवेशाबाबत ते म्हणाले, "पक्षात घेतले. बोंबाबोंब झाल्यावर त्याला स्थगिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले स्थानिक पातळीवर चौकशी केली. जर तो हत्याकांडमध्ये सहभागी होता तर त्याला प्रवेश का दिला? आणि जर नसेल तर त्याला स्थगिती का दिली?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.