‘जिंकून दाखवणारच!’ बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 10:54 IST2022-10-09T10:54:13+5:302022-10-09T10:54:44+5:30
शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला.

‘जिंकून दाखवणारच!’ बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंचा निर्धार
शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला, तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ठाकरे, शिंदे गटाने केली होती. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या प्रकरणाबाबतची निवडणूक आयोगासमोरील पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी, १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसंच या फोटोसोबत त्यांनी जिंकून दाखवणारच असंही कॅप्शन दिलं आहे.
निवडणूकआयोगाचानिर्णयकाय?
नावाबाबत शिवसेनेतील दोन गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक दिलासा दिला आहे. दोन्ही गटांची जर इच्छा असेल तर शिवसेना हे नाव वापरून त्यापुढे स्वत:च्या गटाचे नाव जोडून ते वापरण्यास आयोगाने हरकत घेतलेली नाही. त्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे याचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार निवडणूक आयोगासमोर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सादर करावे लागती, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.