Kolhapur: पोलिस दीक्षांत समारंभात चंदगडची लेक महाराष्ट्रात नंबर एक, अष्टपैलू कामगिरी करत मिळविले मानाचे पाच पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:31 IST2025-12-26T12:29:43+5:302025-12-26T12:31:09+5:30
वडिलांचे छत्र हरपले, आईचे पाठबळ मिळाले, रोज सहा किलोमीटरची पायपीट करून शिक्षण पूर्ण केले

Kolhapur: पोलिस दीक्षांत समारंभात चंदगडची लेक महाराष्ट्रात नंबर एक, अष्टपैलू कामगिरी करत मिळविले मानाचे पाच पुरस्कार
निंगाप्पा बोकडे
चंदगड : वडिलांचे छत्र हरपले म्हणून खचली नाही. आईचे पाठबळ मिळाले. त्या जोरावर रोज सहा किलोमीटरची पायपीट करून शिक्षण पूर्ण केलेल्या जकनहट्टी येथील प्रियांका श्यामला शांताराम पाटील हिने नाशिक येथील महाराष्ट्र प्रबोधिनीत १२६ व्या दीक्षांत समारंभात प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांमध्ये अष्टपैलू कामगिरी केली. तिने मानाचा 'रिव्हाॅल्व्हर ऑफ ऑनर' हा पुरस्कार मिळविल्याने चंदगडची ही लेक महाराष्ट्रात नंबर एक ठरली आहे.
जकनहट्टी येथील प्रियांका पाटील हिने सुरुवातीपासून हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत गावात चौथीपर्यंतचे तर रोज सहा किलोमीटरची पायपीट करून पुढील शिक्षण कोवाडमध्ये पूर्ण केले. दरम्यानच्या काळात तिच्या वडिलांचे निधन झाले. पण मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून तिची आई पाठीशी खंबीर उभी राहिली.
त्यामुळे प्रियांकाने मागे वळून न बघता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. सध्या तिचे प्रशिक्षण नाशिक येथील महाराष्ट्र प्रबोधिनीत सुरू असताना दीक्षांत समारंभात तिने अष्टपैलू कामगिरी करत मानाचे पाच पुरस्कार मिळविले. त्यामुळे परिस्थितीचे भांडवल करणाऱ्यांसाठी प्रियांकाची कामगिरी प्रेरणादायी ठरली असून, तिचे तालुक्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रियांकाला मिळालेले पुरस्कार
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणजेच रिव्हाॅल्व्हर ऑफ ऑनर, बेस्ट ट्रेनी, सर्वोत्कृष्ट कायदा, सर्वोत्कृष्ट अभ्यास व सर्वोत्कृष्ट कवायत असे एकूण पाच पुरस्कार प्रियांका हिला मिळाले आहेत.
तालुक्यातील तीनजण चमकले
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक प्रियांका पाटील हिच्यासोबतच तालुक्यातील बागिलगे येथील तुषार पाटील याला तामिळनाडूमध्ये ओव्हर ऑल बेस्ट ट्रेनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोवाडच्या वैशाली खन्नूरकर हिने प्रशिक्षणादरम्यान चमकदार कामगिरी केल्याने चंदगड तालुक्याचे नाव राज्यभर पोहचले आहे.
यशात आईचा मोठा वाटा
परिस्थितीने मला खूप काही शिकवलं असून, आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करणार आहे. आई-वडिलांसह प्रबोधिनीतील मार्गदर्शकांचा माझ्या यशात मोलाचा वाटा असल्याचे पाटील हिने सांगितले.