सह्याद्रीच्या जंगलात वाघांचे ‘व्हाॅट्सॲप; सेनापती अन् चंदाच्या भेटीचे संकेत, ट्रॅप कॅमेऱ्यातून समोर आले रंजक दृश्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:42 IST2026-01-05T15:41:58+5:302026-01-05T15:42:29+5:30
वाघांचे ‘नोटीस बोर्ड’ आणि संवाद नेमका असतो कसा... वाचा सविस्तर

सह्याद्रीच्या जंगलात वाघांचे ‘व्हाॅट्सॲप; सेनापती अन् चंदाच्या भेटीचे संकेत, ट्रॅप कॅमेऱ्यातून समोर आले रंजक दृश्ये
विकास शहा
शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रेमींना थक्क करणारी एक घटना समोर आली आहे. एरवी आपले हद्दक्षेत्र जपण्यासाठी एकमेकांच्या जिवावर उठणारे वाघ, सह्याद्रीच्या निबिड अरण्यात मात्र एकाच उंबराच्या झाडापाशी एकत्र आल्याचे दिसून आले आहे. ‘सुभेदार’, ‘सेनापती’ आणि ‘बाजी’ या तीन नर वाघांनी एकाच वनपरिक्षेत्रातील एका झाडाचा वारंवार वापर ‘नोटीस बोर्ड’सारखा केल्याने वन विभागाचे लक्ष वेधले गेले आहे.
सह्याद्रीच्या जंगलात महत्त्वाच्या ठिकाणी एका जुन्या उंबराच्या झाडावर ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. या कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये धक्कादायक पण रंजक माहिती समोर आली. सुरुवातीला ‘सुभेदार’ नावाचा वाघ या झाडापाशी आला, त्यानंतर १० दिवसांनी ‘सेनापती’ आणि त्यानंतर ‘बाजी’ या वाघाने त्याच झाडावर आपल्या खुणा सोडल्या. हे तिन्ही वाघ एकाच हद्दक्षेत्रात वावरत असून, अन्न आणि शिकारीच्या उपलब्धतेमुळे हे घडत असावे, असा अंदाज आहे.
वाघांचे ‘नोटीस बोर्ड’ आणि संवाद
वाघांचे हद्दक्षेत्र विस्तृत असते. सहसा मादीचे ५० ते १५० चौरस किलोमीटर, तर नराचे १५० ते २५० चौरस किलोमीटर हद्दक्षेत्र असते. हद्दक्षेत्र निश्चित करण्यासाठी वाघ अथवा वाघीण गुदग्रंथी, मूत्र फवारणे व जमिनीवर अथवा झाडावर नखांनी ओरखडे उठवून आपले हद्दक्षेत्र करतात. यावरून नवख्या वाघांना या परिसरात प्रवेश करताना आदीच्या वाघांचे लिंग, प्रजननाची स्थिती याची माहिती कळते.
‘सेनापती’ आणि ‘चंदा’ एकमेकांना देतात संदेश
केवळ तीन नर वाघच नव्हे, तर याच परिक्षेत्रात ‘सेनापती’ वाघ आणि ‘चंदा’ वाघीण यांच्याही हालचाली वाढल्या आहेत. या दोघांकडूनही वारंवार ‘गंध खुणांचा’ वापर केला जात आहे. हे दोघेही एकमेकांना संदेश देत असून, लवकरच ते एकत्र येण्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे.
कुणाचे साम्राज्य किती?
वाघाचे नाव हद्दक्षेत्र (अंदाजे)
- सेनापती / २६० चौरस किलोमीटर
- सुभेदार / ११० चौरस किलोमीटर
- बाजी / १२० चौरस किलोमीटर
एकाच झाडावर तिन्ही नर वाघांचे अस्तित्व टिपले जाणे ही दुर्मीळ बाब आहे. गंध खुणांच्या माध्यमातून त्यांचे एकमेकांशी संवाद सुरू आहेत. विशेषतः सेनापती आणि चंदा वाघीण यांच्यातील हालचाली आशादायक आहेत. - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.