Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:52 IST2025-08-19T17:49:36+5:302025-08-19T17:52:08+5:30

मुंबई आणि उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

Threat of heavy rain in Mumbai; Guardian Minister Lodha instructs Disaster Management Department to be alert | Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश

Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश

मुंबई आणि उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा जोर पाहता, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी पूर्णपणे सज्ज राहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मंत्री लोढा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण राज्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुंबईतील विभागालाही सतर्क राहण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळातील सर्व सहकारी राज्यातल्या विविध भागात जनजीवन सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत.

या बैठकीत लोढा यांनी मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशीही चर्चा केली. मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत होते, त्यामुळे अशा ठिकाणी तातडीने पंप लावून पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

यासोबतच, टेकड्यांवर असलेल्या वस्त्यांमध्ये अधिक सतर्क राहून व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिली. लोढा यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, पालिकेची यंत्रणा कार्यरत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची काळजी घ्यावी.

Web Title: Threat of heavy rain in Mumbai; Guardian Minister Lodha instructs Disaster Management Department to be alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.