Ajit Pawar IPS Anjali Krishna News: मी तुमच्यावर कारवाई करेन, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना कारवाईपासून रोखले. त्या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे फिरत असून, अजित पवारांवर टीका होत आहे. अवैध उत्खननावरील कारवाई रोखल्यामुळे टीकेचे धनी होत असलेल्या अजित पवारांनी अखेर मौन सोडले आणि खुलासा केला.
अजित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबद्दल भूमिका मांडली आहे.
अंमलबजावणीत हस्तक्षेप करायचा नव्हता, तर...
अजित पवारांनी म्हटले आहे की, "सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता."
"आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे", असेही अजित पवार म्हणाले आहेत.
मी कठोर कारवाई करण्यास कटिबद्ध
"मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे", अशी भूमिका अजित पवारांनी या सगळ्या प्रकारावर मांडली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात ही घटना घडली होती. कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी अवैध मुरूम उत्खनन सुरू होते. ते रोखण्यासाठी महसूलचे अधिकारी गेले. पण, तेथील लोकांनी कारवाईपासून रोखले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा पथकासह तिथे गेल्या होत्या.
त्याच वेळी तिथे असलेल्या एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना कॉल केला आणि मोबाईल अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. त्यानंतर अजित पवारांनी त्यांना थेट तुमच्या कारवाई करेन असा दम देत कारवाई न करण्याचे आदेश दिले होते.