ऐनवेळी भाषणास संधी नाही, अजितदादांचा मोठा निर्णय; म्हणाले, “मी अन् एकनाथरावांनी ठरवलेय की...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 22:29 IST2025-04-15T22:26:51+5:302025-04-15T22:29:19+5:30

Deputy CM Ajit Pawar News: अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी रायगडावर आणि चैत्यभूमीवरील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही.

there is no opportunity for addressing second time deputy cm ajit pawar took big decision and clear stand | ऐनवेळी भाषणास संधी नाही, अजितदादांचा मोठा निर्णय; म्हणाले, “मी अन् एकनाथरावांनी ठरवलेय की...”

ऐनवेळी भाषणास संधी नाही, अजितदादांचा मोठा निर्णय; म्हणाले, “मी अन् एकनाथरावांनी ठरवलेय की...”

Deputy CM Ajit Pawar News: अलीकडेच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर आले होते. अमित शाह यांच्या या दौऱ्यावेळी रायगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी मात्र रायगडावर वेगळीच बाब पाहायला मिळाली. केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात दोन्ही उपमख्यमंत्र्यांचे नियोजित भाषण ऐनवेळेला रद्द करण्यात आले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

चैत्यभूमीवरील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे भाषण होणार होते. परंतु, ऐनवेळी या दोघांचेही भाषण रद्द करण्यात आले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतरही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. 

मी अन् एकनाथरावांनी ठरवलेय की...

पत्रकारांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मी आणि एकनाथरावांनी ठरवले आहे की, आता इथून पुढे कितीही घाईगडबड असली तरीही दोन-दोन मिनिटे भाषण करायचे. जेणेकरून परत असा मुद्दा उपस्थित होणार नाही. वेळेचे गणित बसवून निर्णय घेतला जातो. परवा राज्यपाल बोलले, मुख्यमंत्री बोलले तो कार्यक्रम संपला. आम्हाला आश्चर्य वाटते की, आमच्याकडे एवढे लक्ष आहे. इथून पुढे कोणताही कार्यक्रम असला तरीही आम्ही थोडेसे तिथे बोलणार आहोत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी रायगडावर बोलण्याची संधी मिळाली नाही, यावर बोलताना अजित पवार म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे कसे गेले पाहिजे, यासंदर्भाने रायगडावर चर्चा झाली. तसेच रायगडावर सर्वांनी भाषणे केली. पण वेळ कमी होता, त्यामुळे मी काही भाषण केले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले, असे अजित पवार यांनी सांगितले. 

 

Web Title: there is no opportunity for addressing second time deputy cm ajit pawar took big decision and clear stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.