"दावोस आणि गुंतवणुकीवर उद्धवसेना आणि काँग्रेसने बोलावं, याहून मोठा विनोद नाही’, भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:15 IST2026-01-21T12:14:35+5:302026-01-21T12:15:26+5:30
BJP Criticize Shiv Sena UBT & Congress: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस येथे असून, तिथे त्यांनी राज्यातील गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत करार केले आहेत. मात्र यापैकी काही कंपन्या ह्या भारतीयच असल्याने त्यांच्यासोबत करार करण्यासाठी दावोसचा दौरा करण्याची काय गरज, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

"दावोस आणि गुंतवणुकीवर उद्धवसेना आणि काँग्रेसने बोलावं, याहून मोठा विनोद नाही’, भाजपाचा टोला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस येथे असून, तिथे त्यांनी राज्यातील गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत करार केले आहेत. मात्र यापैकी काही कंपन्या ह्या भारतीयच असल्याने त्यांच्यासोबत करार करण्यासाठी दावोसचा दौरा करण्याची काय गरज, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दावोस आणि गुंतवणुकीवर उद्धवसेना आणि काँग्रेसने बोलावं, याहून मोठा विनोद नाही, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून, त्यात ते लिहितात की, दावोस आणि गुंतवणुकीवर उद्धवसेना आणि काँग्रेसने बोलावं, याहून मोठा विनोद नाही. काँग्रेसच्या कृपेने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, एका उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटके ठेवली जातात. ही परिस्थिती भयानक होती. अशा वातावरणात भयभीत झालेले उद्योग राज्याबाहेर जात असताना, उद्योग, गुंतवणूक, रोजगार आणि उद्धवसेना आणि कॉंग्रेस यांचा काही संबंध असू शकतो का? असा सवालही उपाध्ये यांनी विचारला.
त्यांनी पुढे लिहिले की, काँग्रेस सत्तेवर असताना उद्योगपतींना कसा भ्रष्टाचार, खंडणी आणि दबावाला सामोरे जावे लागत होते, याच्या कहाण्या आजही चर्चेत आहेत.आज मात्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक सातत्याने वाढत आहे, हीच वस्तुस्थिती आहे, असा टोलाही उपाध्ये यांनी यावेळी लगावला.