..तर संजय राऊत यांची जीभ हासडण्यात येईल, आमदार इद्रिस नायकवडींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:23 IST2025-09-16T15:23:04+5:302025-09-16T15:23:32+5:30
परिस्थितीनुसार स्वबळावर लढण्याचा निर्णय

..तर संजय राऊत यांची जीभ हासडण्यात येईल, आमदार इद्रिस नायकवडींचा इशारा
मिरज : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणाऱ्या संजय राऊत यांची जीभ हासडण्यात येईल, असा इशारा आमदार इद्रिस नायकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा आमदार नायकवाडी यांनी निषेध केला. अजितदादा यांच्याविषयी बोलताना संजय राऊत यांनी विचार करावा, अन्यथा त्यांची जीभ हासडण्यात येईल, असा इशारा आमदार नायकवाडी यांनी दिला. ते म्हणाले, संजय राऊत यांचीच डीएनए चाचणी करावी. अजितदादांच्या विरोधात बोलल्यास त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल.
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अधिक वेळ देण्यासाठी मी स्वतःहून राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असेही आमदार नायकवाडी यांनी सांगितले. अजितदादांनी राज्यातील अल्पसंख्यांकाना हजारो कोटींच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे अल्पसंख्यांकाचा ओढा आहे.
मी मागणी न करता मला विधान परिषदेवर संधी मिळाली, सांगली महापालिकेतील अकरा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा दावा करत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मात्र, परिस्थितीनुसार स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही आमदार नायकवाडी यांनी स्पष्ट केले.