"शिंदे-फडणवीसांसोबत येणारं तिसरं इंजिन मनसेचं की राष्ट्रवादीचं? हे CM च्या कृतीतून दिसेल"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 20:19 IST2023-01-22T20:18:48+5:302023-01-22T20:19:23+5:30
आम्ही उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितले आहे. नाना पटोलेंनी काँग्रेस स्वबळावर लढणार असं म्हणतात ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. आपण एकत्र आलोय याची घोषणा करू असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

"शिंदे-फडणवीसांसोबत येणारं तिसरं इंजिन मनसेचं की राष्ट्रवादीचं? हे CM च्या कृतीतून दिसेल"
मुंबई - कुठल्यातरी वर्तमानात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत केलेले भाषण वाचलं. त्याची टॅगलाईन झाली नाही असं वाटतं. आम्हाला तिसरं इंजिन ज्वाईन करणार असं त्यांनी म्हटलं. मग हे तिसरं इंजिन २ आहेत. एक राष्ट्रवादीमधलं आणि दुसरं मनसेमधलं. याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच करायला हवा किंवा त्यांच्या कृतीतून ते दिसेल असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितले आहे. नाना पटोलेंनी काँग्रेस स्वबळावर लढणार असं म्हणतात ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. आपण एकत्र आलोय याची घोषणा करू. त्यानंतर ज्यांना एकत्र यायचं आहे त्यांचे स्वागत करू पण एकत्रच आपण घोषणा केली तर अधिक चांगले होईल असं उद्धव ठाकरेंचे मत आहे. आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत तुम्ही प्रयत्न करा. ज्यादिवशी तुमचे प्रयत्न यशस्वी झाले तेव्हा आम्हाला सांगा. यशस्वी झाले नाहीत तरी आम्हाला सांगा आपण घोषणा करून मोकळं होऊया असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीला गरज असेल तर ते आमच्याशी बोलतील. आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलायला गेलो तेव्हा त्यांनी नाकारला. त्यामुळे त्यांना गरज असेल तर वंचितशी बोलतील आम्ही बोलायला जाणार नाही. मुर्खांचा बाजार राजकारणात फार मोठा आहे. ज्या सरकारने पेन्शन रद्द केली त्याच पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असाल तर धन्य आहे. ज्या संघटनांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला त्यांना सवाल आहे. नुसती घोषणा करण्यात अर्थ नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.