विधवा प्रथा बंद करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, सर्व ग्रामपंचायतींसाठी परिपत्रक केलं जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 23:34 IST2022-05-18T23:33:31+5:302022-05-18T23:34:38+5:30
Maharashtra Government News: हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा आदर्श समोर ठेवत राज्यात विधवा प्रथा बंद करण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवत आपापल्या गावात विधवा प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलावीत, असं परिपत्रक राज्य सरकारने जारी केलं आहे.

विधवा प्रथा बंद करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, सर्व ग्रामपंचायतींसाठी परिपत्रक केलं जारी
मुंबई - देशात विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान सन्मानापासून बाजूला ठेवले जाते. विधवा प्रथा बंद व्हावी व त्या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे, असा निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने नुकताच ग्रामसभेत घेतला होता. त्याचं राज्यभरातून कौतुक झालं. दरम्यान, आता य़ा निर्णयाला शासन निर्णयाचे रूप प्राप्त झाले आहे. हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा आदर्श समोर ठेवत राज्यात विधवा प्रथा बंद करण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवत आपापल्या गावात विधवा प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलावीत, असं परिपत्रक राज्य सरकारने जारी केलं आहे. हे परिपत्रक १७ मे रोजी जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी येत्या ३१ मे रोजी होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीला परिपत्रक काढून हा कायदा अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यांनी दिले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा महिलांना सामाजिक सन्मान देण्यासाठी व विधवा प्रथा बंद करण्यासाठी सरपंच सुरगोंडा पाटील यांनी ग्रामसभेत विषय पत्रिकेवर विषय घेवून ठराव केला होता. ग्रामसभेने या ठरावाला एकमताने मंजुरी दिली होती. त्यामुळे विधवा प्रथेविरोधातील चळवळीची हेरवाड ग्रामपंचायत शिल्पकार ठरणार आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्वच थरांतून स्वागत होत आहे.