"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:24 IST2025-07-20T13:22:28+5:302025-07-20T13:24:11+5:30
नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी गंभीर आरोप केला. सिंधुदुर्गात राणे कुटुंबाने जितके खून केले, ते सगळेच हिंदू होते, असे जाधव म्हणाले.

"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
Nitesh Rane Avinash Jadhav News: 'मनसेचे लोक गरीब हिंदूनाच मारतात', या मंत्री नितेश राणेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसे नेत्यांनी राणे कुटुंबाबद्दल गंभीर आरोप केले. ठराणे कुटुंबाने ज्या लोकांचे खून केले, ते सगळे हिंदूच होते. त्यावेळी नितेश राणेंनी वडिलांना का सांगितलं नाही की, आपण हिंदूनाच मारतोय", असा स्फोटक आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला. जाधव यांच्याबरोबर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काही नाव घेत राणेंना कुटुंबाला उत्तर देण्याचे आव्हान दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हिंदी सक्तीचा मुद्दा मुंबईत आणि महाराष्ट्रात तापला आहे. काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी न बोलण्याच्या मुद्द्यावरून मारहाण केल्याच्या घटना घडल्या. त्या घटनांचा हवाला देत मंत्री नितेश राणे यांनी मनसेचे लोक फक्त गरीब हिंदूनाच मारतात, अशी टीका केली. राणेंच्या या टीकेनंतर अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी खळबजनक आरोप केले.
राणे कुटुंबाने खून केलेले सगळे हिंदूच होते -अविनाश जाधव
मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले, "सिंधुदुर्गमध्ये जेवढे खून झाले. ते कोण होते, कानडी होते की तमिळ होते? का ख्रिश्चन होते? जेवढे राणे कुटुंबाने लोक मारली, ती सगळीच हिंदू होती ना; मराठीच होती ना ती सगळी कटुंब. जेवढे खून झाले, सिंधुदुर्गमध्ये ते सगळेच हिंदू होते."
"मग तुम्ही तुमच्या वडिलांना का सांगितले नाही की, आपण हिंदूंचेच खून करतोय. त्यामुळे काय बोलतात. कधी बोलतात. कोणाच्या सांगण्यावरून बोलतात. ज्यांनी सांगितलं... तुम्ही एकदा विचार तर करा की, काय बोलतोय", अशी घणाघाती टीका अविनाश जाधव यांनी नितेश राणेंवर केली.
"किती दिवस भांडी घासणार ना? पद टिकवण्यासाठी भांडी घासणारा महाराष्ट्रातील एक मोठं उदाहरण हे आहे. विचार न करता समोरून आलेली स्क्रिप्ट वाचून दाखवतो. भाजपची इच्छा आहे की, हिंदू-मुस्लीम भांडणं महाराष्ट्रात लागावी आणि त्यासाठीच राणेंचे पुत्र नितेश राणे; त्यांना या लोकांनी सोडलेलं आहे", असा आरोप अविनाश जाधव यांनी भाजपवर केला.
संदीप देशपांडेंनी नाव घेत केला आरोप
संदीप देशपांडे यांनी तर थेट नावच घेतली. देशपांडे म्हणाले, "सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक हिंदू नव्हते का? गायब झालेले रमेश कोल्हेकर हिंदू होते की नव्हते? याची त्यांनी उत्तरं द्यावीत. मग आमच्यावर आरोप करावा", असा सवाल संदीप देशपांडेंनी नितेश राणेंना केला.