भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:11 IST2025-07-15T15:10:03+5:302025-07-15T15:11:40+5:30
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्याविरोधात प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
खासदार संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी लक्ष वेधलेल्या राजकीय घटनेबद्दल आता नवीन माहिती समोर आली आहे. सुनील बागुल आणि मामा राजवाडे या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे राऊत म्हणाले होते. आता त्यांच्या प्रवेशाचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. कारण त्यांच्याविरोधात तक्रारच मागे घेण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
घरात शिरून बळजबरीने हाणामारी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी उद्धवसेनेचे तत्कालीन नेते संशयित सुनील बागुल यांच्याकडून जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेण्यात आली होती; मात्र आता फिर्यादी किशोर ऊर्फ गजू घोडके यांनी पोलिसांना पुरवणी जबाब नोंदविल्याने गुन्ह्यात दाखल दरोड्याचे गंभीर कलम वगळण्यात आले आहे. पोलिसांच्या दप्तरी आता हा प्रकार अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदविण्यात आला आहे. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य कमी झाल्याने बागुल आणि राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुनील बागुल यांच्याकडून जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर न्यायालयात सोमवारी (दि. १४) सुनावणी होणार होती; मात्र तत्पूर्वीच नाट्यमय घडामोडी घडून तडजोड झाल्याने बागुल यांनी अर्ज मागे घेतला आणि घोडके यांनीही पोलिस ठाण्यात जाऊन नवा पुरवणी जबाब नोंदवून गहाळ झालेले दागिने सापडले असे म्हटले आहे.
यामुळे आता पोलिसांनी दरोड्याचा कलम वगळून मारहाण प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. यामुळे आता सुनील बागुल यांच्यासह मामा राजवाडे यांच्यासह अन्य जणांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्धवसेनेतून बागुल, राजवाडे यांना काढून टाकण्यात आले. तसेच बागुल, राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेशाच्या मार्गातही अडथळा निर्माण झाला होता.
नेमके काय होते प्रकरण...?
सुनील बागुल यांच्याविरोधात फिर्यादी गजु घोडके यांनी त्यांच्या फेसबुकवर शुक्रवारी (दि. २७) एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी सुनिल बागुल यांच्या कथित गैरव्यवहाराबाबत माहिती दिली होती. यामुळे बागुल यांच्या सांगण्यावरून राजवाडे, देशमुख यांनी त्यांना फोनवरून धमकावले.
यानंतर संशयित सुनील बागुल यांनी सर्वाना कोयते, लोखंडी पाइप, आदी साहित्य घेऊन राहत्या घरी सोमवारी (दि. ३०) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पाठवून घोडके यांना मारहाण केली. घरातील संसारोपयोगी साहित्याची तोडफोड करत चार लाखांचे नुकसान केले. गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद घोडके यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली होती.
'आमच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते, त्याबाबत फिर्यादीने तक्रार मागे घेतली आहे. भाजप प्रवेशाचा संबंध नव्हता, पक्षातून काढून टाकण्यापूर्वी खात्री करायला पाहिजे होती. आमच्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा होता. आता आम्ही पक्षात राहिलेलो नाही, यामुळे आम्हाला पुढचे सर्व मार्ग मोकळे आहेत. मी उद्धवसेना पक्षावर नाराज नाही. मला पक्षाकडून कशाचीही अपेक्षा नव्हती', अशी भूमिका सुनील बागुल यांनी मांडली आहे.
'फिर्यादी याने पुरवणी जबाब नोंदविला आहे. यामध्ये त्याने चोरीला गेलेली सोनसाखळी मिळून आल्याचे म्हटले आहे. यामुळे आता दरोड्याचे कलम वगळण्यात येऊन मारहाणप्रकरणी अदखलपात्र नोंद भद्रकाली पोलिस ठाण्यात या प्रकरणात करण्यात आली आहे. यामुळे संशयितांना अटकेचा प्रश्न आता राहिलेला नाही', असे पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.
'संजय राऊत यांनी केलेल्या द्वीटमध्ये माझ्या हकालपट्टीचा उल्लेख नाही. राजकीय शत्रू होते, म्हणून गुन्हे दाखल झाले. माझ्या पदावर दुसऱ्या व्यक्तीची निवड झाली आहे. यामुळे आता मी पुढचा निर्णय घेईन व लवकरच दिशा ठरवू', अशी राजकीय भूमिका मामा राजवाडे यांनी मांडली आहे.